मोठी दुर्घटना टळली, रेल्वेच्या विद्युतकरणाचे इलेक्ट्रीक वायर चोरीच्या प्रयत्नात रुळावर पडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 07:42 PM2022-04-04T19:42:26+5:302022-04-04T19:42:52+5:30
लोको पायलट आणि गार्ड यांनी सतर्कता बाळगून ही रेल्वे थांबविली. रेल्वे थांबल्याने चोरटे घटनास्थळावरुन पसार झाले.
परभणी : परभणी- परळी रेल्वे मार्गावरील पोखर्णी ते परभणी दरम्यान ४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास विद्युतीकरणाच्या कामासाठी बसविलेले इलेक्ट्रीक कॉपर वायर चोरण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारा दरम्यान इलेक्ट्रीक वायर रेल्वे रुळावर पडल्याने शिर्डी- काकीनाडा एक्स्प्रेस रेल्वे याच मार्गावर मध्यरात्री एक तास थांबविण्यात आली. प्रसंगावधान राखून रेल्वे थांबविण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
शिर्डी येथून काकीनाडाकडे जाणारी एक्सप्रेस रेल्वे परभणी रेल्वे स्थानकावर ४ एप्रिल रोजी पहाटे १ ते २ च्या दरम्यान आली होती. परभणी येथे इंजिन बदलल्यानंतर ही रेल्वे परळीकडे रवाना झाली. परभणी-परळी रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. परभणी-पोखर्णी दरम्यान विद्युतीकरणाचे खांब उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच या खांबांवर इलेक्ट्रिक कॉपर वायर लावले जात आहे. ४ एप्रिलच्या पहाटे २ ते ३ च्या सुमारास शिर्डी-काकीनाडा रेल्वे या मार्गावरुन जात असताना पोखर्णीजवळ चोरट्यांनी इलेक्ट्रिक कॉपर वायर चोरण्याचा प्रयत्न केला. खांबावरील वायर कट केल्याने ते रेल्वे रुळावर पडले होते. त्यामुळे लोको पायलट आणि गार्ड यांनी सतर्कता बाळगून ही रेल्वे थांबविली.
रेल्वे थांबल्याने चोरटे घटनास्थळावरुन पसार झाले. ही बाब नजीकच्या स्टेशन मास्तर यांना कळविण्यात आली. रेल्वेतील आरपीएफ जवानांनीही घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी कॉपर वायर रेल्वे इंजिनसमोर पडल्याचे दिसून आले. कॉपर वायर चोरीच्या उद्देशाने कट करण्याचा हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी परभणी जीआरपी तसेच आरपीएफ रेल्वे पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळपर्यंत कुठलाही गुन्हा नोंद झाला नव्हता. सदरील प्रकार घडल्याच्या वृत्ताला परभणी येथील आरपीएफचे पोलीस निरीक्षक एस.बी. कांबळे यांनी दुजोरा दिला आहे.