पोलिस पाटलाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल
By ज्ञानेश्वर भाले | Published: October 11, 2023 04:46 PM2023-10-11T16:46:16+5:302023-10-11T16:46:51+5:30
वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार
सेलू ( परभणी) : वालूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यास बोरगाव जहांगीर येथील पोलिसपाटील व अन्य एकाने शिविगाळ करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी सेलू ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, मंगळवारी वैद्यकीय अधिकारी अमोल तोरकड हे कर्तव्यावर होते. दरम्यान, रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पोलिसपाटील गोविंद विठ्ठलराव शिंदे (रा. बोरगाव जहांगीर) व अन्य एक जण आरोग्य केंद्रात आले. त्यावेळी तुमच्या आरोग्य केंद्रात काम करणारे कर्मचारी घेर कुठे आहेत, असा सवाल केला. त्यावर डॉ. तोरकड म्हणाले की मला माहीत नाही. पण, तुम्ही कोण आहात? असे विचारले असता दोघांनी डॉ. तोरकर यांच्या गालात चापट मारून शिविगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. घडलेल्या प्रकारानंतर डॉ. तोरकर यांनी पोलिस ठाणे गाठून हकीकत सांगितली. याप्रकरणी पोनि. एस. के. चवरे यांच्या आदेशाने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात पोलिस पाटील गोविंद शिंदे यांना अटक करण्यात आली, तर एकजण फरार झाला आहे. याप्रकरणी पोउनि. पंडित तपास करीत आहेत.