कारागृहात कैद पतीला भेटण्यासाठी जाणाऱ्या महिलेकडून पिस्तूल, काडतूस जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 12:32 PM2022-05-05T12:32:30+5:302022-05-05T12:34:25+5:30
पोलिसांनी रस्त्यामध्येच कैद्याच्या पत्नीकडून जप्त केले काडतुसासह पिस्तूल
सोनपेठ (जि.परभणी) : परभणी जिल्हा कारागृहात असलेल्या कैद्याला भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या पत्नीजवळून पोलिसांनी २ जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल जप्त केले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ४ मे रोेजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.
परभणी जिल्हा कारागृहात असलेल्या कैदी सनिदेवल काळे याला भेटण्यासाठी त्याची पत्नी पिरी सनिदेवल काळे (रा.मोहोळ, जि.सोलापूर) ही येत असून, गंगाखेड तालुक्यातील महातपुरी तांडा येथे ती थांबली आहे. तिच्याकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरुन ४ मे रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे पथक महातपुरी तांडा येथे दाखल झाले. तेव्हा महातपुरी तांडा ते सोनपेठ रस्त्यावर कॅनालजवळ एक महिला लहान बाळासह वाहनाची वाट पहात रस्त्याच्या कडेला थांबलेली पोलिसांना दिसली.
पोलीस कर्मचारी आव्हाड यांनी पंचासमक्ष या महिलेची झडती घेतली तेव्हा पिशवीमध्ये एका रुमालामध्ये गुंडाळुन ठेवलेले एक गावठी पिस्टल (कट्टा) व दोन जिवंत काडतूस आढळले. हे पिस्टल पती सनीदेवल काळे याचे आहे, असे या महिलेने पोलिसांना सांगितले. पोलीस उपनिरीक्षक एम.बी. चव्हाण यांनी जप्ती पंचनामा करुन पिस्टल आणि काडतूस जप्त केले आहेत. या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.