दसऱ्याच्या बंदोबस्ताला निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा रेल्वेखाली सापडून मृत्यू
By राजन मगरुळकर | Published: October 5, 2022 12:38 PM2022-10-05T12:38:20+5:302022-10-05T12:38:45+5:30
दसऱ्याच्या दिवशीच पोलीस कुटुंबावर दुःखाचा डोंगर; परभणी रेल्वे स्थानकावर घडली दुर्घटना
परभणी : दसऱ्याच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा चालत्या रेल्वे गाडीत चढताना तोल गेल्याने पाय घसरून रेल्वेखाली सापडल्याने मृत्यू झाला. ही घटना परभणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेने दसऱ्याच्या दिवशी पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबासह जिल्हा पोलीस दलावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दत्ताराम श्रीराम घाग (५२, रा.पोलीस वसाहत, परभणी) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दत्ताराम घाग हे परभणी पोलीस दलातील आरसीपी प्लाटून एकमध्ये कार्यरत होते. दसऱ्याच्या दिवशी त्यांचा मानवत येथे पोलीस बंदोबस्त लागला. या बंदोबस्ताला जाण्यासाठी पोलीस कर्मचारी दत्ताराम घाग हे बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास परभणी स्थानकावर आले. हैदराबाद येथून औरंगाबादकडे जाणारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म दोनवर उभी होती. ही रेल्वे निघताना दत्ताराम घाग हे चालत्या गाडीत चढत होते. त्यावेळी त्यांचा तोल गेला. यात ते रेल्वेखाली सापडले. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी केली पाहणी
घटनेनंतर रेल्वे पोलीस जीआरपी आणि आरपीएफ यांनी स्थानकातील घटनास्थळी धाव घेतली तसेच पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मूम्मका सुदर्शन, सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांनी रेल्वे स्थानकात घटनेची पाहणी करून मयत पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
पोलीस कुटुंबावर शोककळा
जीआरपीचे पोलीस कर्मचारी राम कातकडे, अमीनोद्दीन फारोकी, आरपीएफचे दीपक कुमार, सुरवाडे यांनी पंचनामा व पुढील प्रक्रिया केली. जीआरपीचे पोलीस कर्मचारी राम कातकडे घटनेचा तपास करीत आहेत. या प्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया जीआरपी ठाण्यात सुरु होती. दसऱ्याच्या दिवशी बंदोबस्ताला निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूने पोलीस कुटुंबावर तसेच जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.