'आत्महत्या करावीशी वाटते', वरिष्ठांसोबत वादानंतर बेपत्ता झालेला पोलीस कर्मचारी सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 12:35 PM2022-09-27T12:35:33+5:302022-09-27T12:35:43+5:30
पोलीस कर्मचाऱ्यांनी स्टेट्स पाहताच एकच खळबळ उडाली. मात्र, मोबाईल बंद असल्याने कर्मचाऱ्याचा शोध लागत नव्हता.
पाथरी (परभणी): ड्युटीवर असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कामकाजावरून झालेल्या वादानंतर आत्महत्या करावीशी वाटत आहे, असे स्टेट्स अपडेट करून बेपत्ता असलेला पोलीस कर्मचारी मुदखेड रेल्वे स्थानक परिसरात सापडला आहे. पाथरी पोलिसांनी आज सकाळी कर्मचाऱ्याला कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे.
जमादार रफिक मुस्ताक अन्सारी पाथरी पोलीस ठाण्यात गोपनीय शाखेत कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी ठाण्यातील कामकाजावरून पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांच्यासोबत जमादार अन्सारी यांचा वाद झाला. त्यानंतर जमादार अन्सारी यांनी, अधिकाऱ्यांनी आपल्याला अपमानित केल्याने आपणास आत्महत्या करावी वाटते, असे व्हाट्सअप स्टेटस अपडेट करून मोबाईल बंद करून ठाणे सोडले.
पोलीस कर्मचाऱ्यांनी स्टेट्स पाहताच एकच खळबळ उडाली. मात्र, मोबाईल बंद असल्याने कर्मचाऱ्याचा शोध लागत नव्हता. शेवटच्या मोबाईल लोकेशनवरून पाथरी पोलीसांच्या पथकाने शोध सुरू केला. दरम्यान, आज पहाटे हा कर्मचारी मुदखेड रेल्वेस्थानक परिसरात आढळून आला. पोलिसांनी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान त्याला पाथरी येथे आणले. त्यानंतर त्याला कुटुंबाकडे स्वाधीन केले आहे. यामुळे पोलिस यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आहे.