जगन्नाथ पुरी रथयात्रेनिमित्त सोमवारी विशेष रेल्वे धावणार
By राजन मगरुळकर | Published: June 18, 2023 02:44 PM2023-06-18T14:44:09+5:302023-06-18T14:45:05+5:30
नांदेड-खुर्डा रोड ही रेल्वे सोमवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी नांदेड येथून सुटणार आहे.
परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेनिमित्त विभागातून तीन विशेष रेल्वेच्या प्रत्येकी एक फेरी सोडल्या जाणार आहेत. यामध्ये नांदेड विभागातून नांदेड-खुर्डा रोड आणि खुर्डा रोड-नांदेड अशी विशेष रेल्वे फेरी धावणार आहे. नांदेड-खुर्डा रोड ही रेल्वे सोमवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी नांदेड येथून सुटणार आहे.
रथ यात्रेनिमित्त जगन्नाथ पुरी येथे भाविकांना जाण्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी सिकंदराबाद विभागातून तीन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय दमरे विभागाने घेतला आहे. यामध्ये रेल्वे क्रमांक (०७०६३) नांदेड-खुर्डा रोड ही रेल्वे सोमवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी नांदेड येथून सुटणार आहे. सदरील रेल्वे मुदखेड, बासर, निजामाबाद, कामारेडी, मेडचल, सिकंदराबाद, नालगोंडा, गुंटूर, विजयवाडा, राजमुंद्री, शामलकोट, बेऱ्हामपुर मार्गे खुर्डा रोड येथे जाणार आहे. ही रेल्वे मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता खुर्डा रोड येथे पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक (०७०६४) खुर्डा रोड-नांदेड ही रेल्वे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता खुर्डा रोड येथून सुटणार आहे. याच मार्गे ही रेल्वे बुधवारी रात्री साडेनऊ वाजता नांदेडला पोहोचणार आहे. या रेल्वेला वातानुकूलित द्वितीय कक्ष, तृतीय कक्ष, शयनयान आणि जनरल अनारक्षित डबे जोडलेले असतील.