परभणी सिटी सर्व्हेसाठी दिल्लीचे ४५ जणांचे पथक दाखल
By राजन मगरुळकर | Published: October 11, 2022 12:34 PM2022-10-11T12:34:22+5:302022-10-11T12:39:44+5:30
पंधरा दिवस केली जाणार विविध ठिकाणांची पाहणी
- राजन मंगरुळकर
परभणी : भारत सरकारच्या संसदेच्या राष्ट्रीय महत्त्व विशेष संस्थांनच्यावतीने दिल्ली येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरचे ३८ विद्यार्थी आणि ७ प्राध्यापक यांचा समावेश असलेले ४५ जणांचे पथक शहराच्या सर्व्हेसाठी परभणीत दाखल झाले आहे. सोमवारी शहरात आलेल्या या पथकाकडून पुढील १५ दिवस विविध ठिकाणांची पाहणी केली जाणार आहे.
तीन लाख लोकसंख्या असलेल्या राज्यातील तीन शहरांची निवड या पथकाने केली आहे. यात अहमदनगर, जालना आणि परभणीचा समावेश आहे. दिल्ली येथून राष्ट्रीय महत्त्व संस्थानचे हे पथक परभणीत दाखल झाले आहे. यात स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरचे ३८ विद्यार्थी आणि सात प्राध्यापक यांचा समावेश आहे. घर बांधणी, वाहतूक व्यवस्था, प्रदूषण, पर्यटन, टाऊन प्लॅनिंग, शहरातील इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध बाबींचा सर्वे या पथकाकडून केला जाणार आहे. सध्याची शहराची वाहतूक व्यवस्था, शहरातील रस्ते, अंतर्गत वसाहतीतील घरे, स्लम एरिया, पार्किंगची समस्या, रिंग रोड, बायपास रस्ता, दुर्घटना घडणारे ब्लॅक स्पॉट, पादचारी पथ आणि वाहतूक व्यवस्थेशी संबंधित अशा विविध बाबींचा सर्वे या पथकाकडून केला जाणार आहे.
शहराच्या विकासाला व आगामी काळातील वीस वर्षाचे नियोजन करण्यासाठी गती देणारे रोल मॉडेल या पथकाकडून तयार केले जाणार आहे. या सर्वेेची माहिती टाऊन प्लॅनिंग विभागाकडे व भारत सरकारच्या संबंधित मंत्रालय स्तरावर आगामी दोन महिन्यांमध्ये दिली जाणार आहे. या पथकाचे निदेशक पी.एस.एन.राव हे असून परिवहन विशेषज्ञ प्राध्यापक सेवाराम हे विद्यार्थ्यांसह परभणीत दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून शहर हद्दीत सर्व ठिकाणी पाहणी आणि सर्वे केला जाणार आहे.
आज महामार्गावर केली जाणार पाहणी
पाथरी रोड, जिंतूर रोड, गंगाखेड रोड, वसमत रोड या मार्गावर रिंग रोड असणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या, त्यांची नोंदणी आणि रिंग रोडची असलेली गरज या बाबतचा सर्वे या पथकाकडून आज शहर वाहतूक शाखेच्या मदतीने केला जाणार आहे.
अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या भेटी
विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाने परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्यासह संबंधित संसद प्रतिनिधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. सोमवारी काही ठिकाणी पथकाने भेटीही दिल्या. शहरातील समस्या, सध्याची परिस्थिती समजून घेत हा सर्वे पूर्ण केला जाणार असल्याचे परिवहन विशेषज्ञ प्रा.सेवाराम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
या बाबींचा होणार सर्व्हे
शहरातील रस्ते, वाहतुकीसाठीची साधने, वाहनांची संख्या, पार्किंगच्या जागा, ब्लॅक स्पॉट, महामार्ग अंतर्गत रस्ते, पादचारी पथ, सडक सुरक्षितता, रिंग रोड, बायपास आणि प्रत्यक्ष घरोघरी जाऊन शहरातील सुविधा व तांत्रिक बाबींची माहिती पथकातील विद्यार्थी, विद्यार्थिनी गोळा करणार आहेत.