९० वर्षाची परंपरा कायम! तुकोबांच्या पालखी सोहळ्यात पाथरी तालुक्यातील बाभळगावचा अश्व
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 05:38 PM2023-06-14T17:38:14+5:302023-06-14T17:40:52+5:30
पाथरी तालुक्यातील बाभाळगाव येथील विनायकराव नारायणराव रणेर यांच्या घराण्याने वारकरी संप्रदायाची ही परंपरा तीन पिढ्यापासून सांभाळली आहे.
- विठ्ठल भिसे
पाथरी ( परभणी ) : जगद्गुरू तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्यात पाथरी तालुक्यातील बाभळगावचे विनायकराव नारायणराव रणेर यांच्या घराण्यातील मानाचा अश्र्व प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी सहभागी झाला आहे. 9 जून रोजी देहू येथील पालखीसोबत पायी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. 14 जून रोजी पुण्यात सकाळी दाखल झाला आहे. दिंडी सोहळ्यात होणाऱ्या उभ्या आणि आडव्या रिंगणात अश्व सहभागी होतो.
पाथरी तालुक्यातील बाभाळगाव येथील विनायकराव नारायणराव रणेर यांच्या घराण्याने वारकरी संप्रदायाची ही परंपरा तीन पिढ्यापासून सांभाळली आहे. तुकोबांच्या पालखीबरोबर असणारा देवाचा अश्व या घराण्याकडून देहूच्या वारीत सहभागी होतो आणि पालखीला पांडुरंगाच्या पायाशी नेऊन पोहोचवतो. माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांबरोबर एक देवाचा आणि एक स्वाराचा अश्व असतो. देवाच्या अश्वावर माउलींच्या आणि तुकोबांच्या पादुका असतात.
रणेर घराण्याने ही परंपरा तीन पिढ्यांपासून म्हणजे सुमारे 90 वर्षांपासून जपली आहे. तुकोबांच्या पालखीबरोबर देवाच्या अश्वाचा मान हा रणेर घराण्याचा आहे. तर स्वाराच्या अश्वाचा अकलुजच्या स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा आहे. आता हा मान धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांभाळला आहे. पालखी प्रस्थानाच्या आदल्या दिवशी हे दोन्ही अश्व देहूमध्ये येतात. यामध्ये बाभुळगावहून येणारा अश्व बाभळगाव येथून आधी थेट पंढरपूरला नेण्यात येतो. तिथे त्याची विधिवत पाद्यपूजा होते आणि तिथून हे अश्व चालत देहूकडे प्रस्थान ठेवतो. तुकोबांच्या पालखीबरोबरचा स्वाराचा अश्व हा अकलूजहून मोहिते पाटलांच्या घराण्यातून येतो. ही प्रथा सुमारे 40 वर्षांपासून सुरू आहे. पालखी प्रस्थानाच्या वेळी हा अश्व देहू येतो आणि देवाचा आणि स्वाराचा असा हा पालखी सोहळ्यात दोन्ही अश्वांचा प्रवास सुरू होतो.
11 दिवसांचा पायी प्रवास....
पंढरपूर ते देहू हा 11 दिवसांचा बारामतीमार्गे पायी प्रवास अश्व करतो, त्याच्याबरोबर 50 टाळकरी मंडळी असतात. देहूच्या वेशीवर अश्व आल्यावर त्याची पाद्यपूजा होते, त्याच्यावर तुकोबांच्या पादुका ठेवल्या जातात आणि नंतर अश्व वारीत सहभागी होतो. 9 जून रोजी देहू येथून पालखी सोबत अश्व सहभागी झाला आहे
वर्षभर मुलासारखा सांभाळ....
देवाच्या अश्वाचा रणेर कुटुंब स्वतःच्या मुलासारखा सांभाळ करतात. तुकोबांच्या पालखीत सहभागी होणारा हा अश्व इतर कोणत्याही कारणासाठी वापरला जात नाही. साधारण 8 ते 9 वर्षांनी हा अश्व बदलला जातो. रणेर कुटुंब हा अश्व स्व- खर्चाने खरेदी करतात.
प्रस्थानाआधी पुण्यातील नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात मुक्काम....
पालखी सोहळ्याच्या दोन दिवस आधी पुण्यातील नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात बाभुळगावचा देवाचा अश्व येतो. येथे एक दिवस त्याचा मुक्काम असतो. त्यानंतर हा अश्व देहूकडे जातो. बाभुळगाव आणि अकलूजहून आलेल्या या दोन्ही अश्वांचे गोल रिंगण बेलवडी, इंदापूर आणि अकलूज, तसेच उभे रिंगण माळीनगर, बाजीराव विहीर आणि वाखरी येथे होते. पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचल्यावर काल्याच्या कीर्तनानंतर दोन्ही अश्व माघारी फिरतात.