रस्त्यावर उभ्या ट्रॉलीवर दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 12:17 PM2024-05-30T12:17:44+5:302024-05-30T12:19:11+5:30
मानवत तालुक्यातील नागरजवळा येथील घटनेत दुचाकीस्वार जागीच ठार
मानवत (परभणी) : तालुक्यातील नागरजवळा रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर पाठीमागून दुचाकी धडकल्याने अठरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ( दि. २९) रात्री ७. ३० वाजता घडली. पांडुरंग बालासाहेब होगे असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे ट्रॉली उभी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग बालासाहेब होगे (१८) हा मानवत तालुक्यातील नागरजवळा येथील रहिवासी आहे. बुधवारी रात्री आपल्या दुचाकीवरून पांडुरंग मानवतकडून गावी परतत होता. रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मानवत ते नागरजवळा रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरच्या ( क्रमाक एम एच 21 डी 3568) ट्रॉलीवर पांडुरंगची दुचाकी धडकली. यात पांडुरंगचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप बोरकर , पो उ नि पाटील , पो हा भारत नलावडे,बंकट लटपटे ,विजय लबडे , शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी विठ्ठल बाबासाहेब होगे यांच्या तक्रारीवरून चालकाविरुद्ध ट्रॅक्टर-ट्रॉली धोकादायक स्थितीत, कोणतीही काळजी न घेता रस्त्यावर उभी करून पांडुरंग बालासाहेब होगे याच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा आज पहाटे दाखल करण्यात आला आहे.