कामावर रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी १२५ संगणक परिचालकांचा जि.प.समोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 04:08 PM2017-09-16T16:08:38+5:302017-09-16T16:08:54+5:30
केंद्र शासनाच्या सीएससीएसपीव्ही मार्फत नियुक्त्या दिलेल्या संगणक परिचालकांना कामावर रुजू करुन घ्यावे.थकीत मानधन द्यावे अशा विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
परभणी, दि.१६ : केंद्र शासनाच्या सीएससीएसपीव्ही मार्फत नियुक्त्या दिलेल्या संगणक परिचालकांना कामावर रुजू करुन घ्यावे, थकीत मानधनाची पूर्तता करावी अशा विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
जिल्ह्यातील १२५ संगणक परिचालकांना कामावर रुजू करुन घेतले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र शासनाच्या सीएससीएसपीव्ही मार्फत नियुक्त्या दिलेल्या संगणक परिचालकांना रुजू करुन घेतले जात नाही. यात कर्मचा-यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
तालुक्यातील २१ संगणक परिचालकांना कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरुन कमी करण्यात आले. यानंतर या परिचालकांना कामावर घेण्याचे आदेश असतानाही याची अंमबजावणी केली जात नाही.
यासोबतच संग्राम प्रकल्पात काम करीत असलेल्या संगणक परिचालकांचे आॅक्टोबर २०१५ ते डिसेंबर २०१६ पर्यंतचे मानधन द्यावे, आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात काम करणा-यांचे ८ महिन्यांचे मानधन द्यावे आदी मागण्यां यावेळी आंदोलकांनी केल्या. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा संगणक परिचालकांनी घेतला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव इक्केवार, उपाध्यक्ष पंढरीनाथ इक्कर, विजय शिंदे, शरद वैरागर आदींसह जिल्ह्यातील परिचालक आंदोलनात सहभागी झाले आहेत.