परभणी जिल्हा रुग्णालयात दीडशे खाटांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:54 AM2018-07-10T00:54:43+5:302018-07-10T00:55:50+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी नवीन १५० खाटा दाखल झाल्याने अनेक वर्षांपासूनची रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. जिल्हा रुग्णालयात निर्माण झालेली खाटांची समस्या लक्षात घेऊन शल्य चिकित्सक डॉ.जावेद अथर यांनी ही मागणी नोंदविली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी नवीन १५० खाटा दाखल झाल्याने अनेक वर्षांपासूनची रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. जिल्हा रुग्णालयात निर्माण झालेली खाटांची समस्या लक्षात घेऊन शल्य चिकित्सक डॉ.जावेद अथर यांनी ही मागणी नोंदविली होती.
परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज १००० ते १२०० रुग्ण उपचारासाठी येतात. त्यातून जवळपास ३०० रुग्ण आंतररुग्ण विभागामध्ये दाखल होतात. या रुग्णालयामध्ये सामान्य रुग्णालय, अस्थीव्यंग विभाग व स्त्री रुग्णालय असे तीन विभाग आहेत. या विभागांतर्गत इतर उपविभाग चालविले जातात. पावसाळ्यामध्ये संसर्गजन्य आजाराने अनेक नागरिक त्रस्त असतात. हे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर रुग्णालयातील बेड (खाटा) अपुऱ्या पडतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला नाईलाजास्तव दोन ते तीन रुग्णांना एकाच बेडवर उपचार द्यावे लागतात.
जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या ५१६ बेड उपलब्ध आहेत. सामान्य रुग्णालयाला ४०६, स्त्री रुग्णालयात ६० तर अस्थीरोग विभागात ५० अशी बेडची विभागणी केली आहे. त्यामुळे ५१६ पेक्षा अधिक रुग्ण दाखल झाल्यानंतर सामान्य रुग्णालय प्रशासनाला रुग्णांवर उपचार करताना कसरत करावी लागत असे. ही समस्या लक्षात घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अथर यांनी वरिष्ठस्तरावर बेडची मागणी केली होती. त्यानुसार ९ जुलै रोजी सकाळी १० वाजता दीडशे बेड मिळाले आहेत. त्यामुळे आता रुग्णालयामध्ये ६६६ बेड उपलब्ध झाले असून, उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
---
या विभागांना मिळाले नवीन खाट
सोमवारी जिल्हा रुग्णालयाला दीडशे नवीन खाट मिळाले आहेत. ज्या विभागामध्ये खाटांची कमतरता आहे, त्या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी विभागनी करुन खाटांचे वाटप केले आहे. यामध्ये स्त्री रुग्णालयाला ४०, संसर्गजन्य वॉर्डला २५, अस्थीव्यंग विभागाला १०, पुरुष सर्जरी विभाग २०, पुरुष वॉर्ड ३० तर महिला कक्षाला २५ खाटा दिल्या जातील, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने दिली.
---
‘लोकमत’ने केला होता पाठपुरावा
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षामध्ये १९ खाट उपलब्ध आहेत. मात्र रुग्णांची संख्या अधिक आहे. या संदर्भात १९ जून रोजी ‘लोकमत’ने ‘१९ खाटांवर ४५ रुग्ण’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. तसेच खाटांची संख्या कमी असल्याने रुग्णांची होणारी होरपळ या वृत्तात मांडली होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने पावले उचलत ९ जुलै रोजी दीडशे खाट उपलब्ध करुन घेतले आहेत.