खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात झाली ६६००० मे़टन खत विक्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 05:19 PM2018-09-21T17:19:45+5:302018-09-21T17:20:40+5:30

खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, कापूस व तूर या पिकांसाठी ६६ हजार ३०० मे़ टन खत खरेदी केले

About 66000 m.ton of fertilizer sale in Parbhani district during Kharif season | खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात झाली ६६००० मे़टन खत विक्री 

खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात झाली ६६००० मे़टन खत विक्री 

Next

परभणी : खरीप हंगामात पिकांना खताची मात्रा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्ह्यासाठी ८५ हजार ९३९ मे़ टन खताचा साठा करून ठेवला होता़ त्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, कापूस व तूर या पिकांसाठी ६६ हजार ३०० मे़ टन खत खरेदी केले आहे़ त्यामुळे सध्या रबी हंगामासाठी कृषी विभागाकडे १९ हजार ६३९ मे़ टन खत शिल्लक आहे़ 

जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पिकांची दरवर्षी जून महिन्यात पेरणी केली जाते़ या पिकांना लागणाऱ्या औषधी व खतांची मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून संबंधित विभागाकडे नोंदविण्यात आली़ त्यानुसार जिल्ह्याला खताचा साठा उपलब्ध होतो़  यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती़ यामध्ये शेतकऱ्यांनी कापसाऐवजी सोयाबीन पिकास प्राधान्य देऊन अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली़ या पिकांना खताची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून खरीप हंगामासाठी १ लाख ५१ हजार १९० मे़ टन खताची मागणी वरिष्ठस्तरावर नोंदविली होती़ 

त्यापैकी ८९ हजार ३६० मे़ टन खत मंजूर झाले़ त्यातून ५० हजार ७६० मे़ टन खत जिल्ह्याला वितरित झाला़ ३१ मार्च २०१८ पर्यंत कृषी विभागाकडे गत रबी हंगामातील ३५ हजार १७९ मे़टन खत उपलब्ध होता़ त्यामुळे कृषी विभागाकडे ८५ हजार ९३९ मे़ टन खताचा साठा झाला़ त्यातील खरीप हंगामात ६६ हजार ३०० मे़ टन खत विक्री झाला़ त्यामुळे कृषी विभागाकडे सध्या रबी हंगामासाठी १९ हजार ६३९ मे़ टन खत उपलब्ध आहे़ विशेष म्हणजे कृषी विभागाने केलेल्या मागणीनुसार खत जिल्ह्याला उपलब्ध झाल्याने यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची कमरता भासली नाही़ 

असा उपलब्ध झाला खतसाठा
जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून वरिष्ठ स्तरावर खताची मागणी नोंदविण्यात आली होती़ त्यानुसार युरिया १८ हजार ९६० मे़टन, डीएपी ८ हजार ८०० मे़टन, एमओपी ३ हजार १०० मे़टन, एनपीके १७ हजार ४०० मे़टन, एसएसपी २ हजार ५०० मे़टन असा एकूण ५० हजार ७६० मे़ टऩ खताचा जिल्ह्याला खरीप हंगामासाठी पुरवठा झाला होता़ 

रबी हंगामाचीही चिंता मिटली
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडे ८५ हजार ९३९ मे़टन खताचा साठा उपलब्ध झाला़ त्यातील ६६ हजार ३०० मे़ टन खताची खरीप हंगामात विक्री झाली़  १० सप्टेंबर २०१८ पर्यंत कृषी विभागाकडे १९ हजार ६३९ मे़ टन खत शिल्लक आहे़ तसेच कृषी विभागही रब्बी हंगामासाठी वरिष्ठ स्तरावर जिल्ह्याला खताचा अधिक साठा उपलब्ध व्हावा, यासाठी मागणी नोंदविणार आहे़ त्यामुळे रबी हंगामातही शेतकऱ्यांना खताची कमतरता भासणार नाही, असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे़ 

Web Title: About 66000 m.ton of fertilizer sale in Parbhani district during Kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.