शिवाजी महाराजांबद्दल पोलीस कर्मचाऱ्यानेच काढले अपशब्द; परभणीत पालममध्ये तीव्र पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 07:15 PM2020-08-05T19:15:39+5:302020-08-05T19:17:19+5:30
शिवप्रेमींनी तहसीलदारांकडे निवेदन देऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली.
पालम ( परभणी ) : शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याची ऑडीओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्याने संतप्त शिवप्रेमींमध्ये तीव्र पडसाद उमटले. याच्या निषेधार्थ नागरिकांनी बुधवारी शहर बंद पुकारत तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. तसेच तहसीलदारांकडे निवेदन देऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबदल भ्रमणध्वनीवर संभाषण करताना शहर पोलीस दलातील जगन्नाथ काळे या कर्मचाऱ्याने पातळी सोडून टिपण्णी केली. यानंतर ही ऑडीओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली. या संतप्त प्रकाराने शिवप्रेमींनी बुधवारी शहरात कडकडीत बंद पाळला. यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन सबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली.
दरम्यान, बाजारपेठेत सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला. राज्य राखीव दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले यांनी या प्रकारचा तपास सुरु असून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.