चौदाशे रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:23 PM2019-05-03T13:23:35+5:302019-05-03T13:25:34+5:30
सातव्या वेतन आयोगासाठी पट पडताळणी करण्यास केली लाचेची मागणी
परभणी : सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सेवापट पडताळणी करण्यासाठी १४०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गंगाखेड येथील डॉ.जाकेर हुसेन शाळेच्या मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडले आहे. २ मे रोजी रात्री परभणीत ही कारवाई करण्यात आली.
या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी- २ मे रोजी या संदर्भात त्यांच्याकडे तक्रार आली होती. गंगाखेड येथील डॉ.जाकेर हुसेन हायस्कूलमधील मुख्याध्यापक अलीयार खान पठाण अमीर खान पठाण हे तक्रारदाराचे मूळ सेवापट सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने पडताळणीसाठी पाठविण्याकरीता १४०० रुपयांची लाच घेत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ मे रोजी रात्री परभणी येथील दर्गारोडवरील मासूम कॉलनीत सापळा लावला असता अलीयार खान पठाण अमीर खान पठाण यांना तक्रारदाराकडून १४०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली असून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नांदेड येथील पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक नूरमहंमद शेख, पोलीस उपअधीक्षक गजानन विखे, पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर, पोहेकॉ लक्ष्मण मुरकुटे, मिलिंद हनुमंते, जमील जहागिरदार, सचिन गुरसूडकर, अनिल कटारे, शेख मुखीद, माणिक चट्टे, सारिका टेहरे, रमेश चौधरी यांनी ही कारवाई केली.