पूर्णा- ताडकळस महामार्गावर दुचाकी अन् पादचाऱ्यात अपघात; तिघे गंभीर जखमी
By मारोती जुंबडे | Published: December 12, 2023 06:25 PM2023-12-12T18:25:25+5:302023-12-12T18:25:47+5:30
पूर्णा- ताडकळस हा महामार्ग नव्याने तयार करण्यात आला आहे.
परभणी: पूर्णा- ताडकळस महामार्गावरील एकरूखा पाटी परिसरात दुचाकी व पादचाऱ्यांमध्ये झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना ११ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या जखमींना परभणी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
परभणी तालुक्यातील तट्टूजवळा येथील संतोष कदम हे त्यांच्या एमएच २२ एवाय ३१२३ या दुचाकीवरून पूर्णा हून गावाकडे येत होते. दरम्यान पूर्णा महामार्गावरील एकरुखा पाटी परिसरात आले असता समोरून पायी चालत येणाऱ्या बबन घोबाळे, धर्मराज ढेगळे यांना जोराची धडक बसली. या घटनेत दुचाकी चालक संतोष कदमसह पादचारी जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलीस ठाण्याचे साहय्यक पोलीस निरीक्षक कपिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून या जखमींना परभणी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गतिरोधक नसल्याने अपघात वाढले
पूर्णा- ताडकळस हा महामार्ग नव्याने तयार करण्यात आला आहे. त्यामुळे गुळगुळीत रस्त्यावरून भरधाव वेगाने दुचाकीसह चार चाकी वाहनधारक वाहने चालवीत आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताच्या संख्येत गेल्या काही दिवसापासून वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने हे अपघात रोखण्यासाठी ठिकठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.