उपजिल्हा रुग्णालयाचा अपघात विभाग होतोय सुसज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:14 AM2021-01-04T04:14:37+5:302021-01-04T04:14:37+5:30
आर. एस. साळेगावकर देवगावफाटा : सर्वसामान्यांना आरोग्यसेवेच्या बाबतीत दिलासादायक ठरणारे सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात आता जिल्हा नियोजन समितीने मंजुरी ...
आर. एस. साळेगावकर
देवगावफाटा : सर्वसामान्यांना आरोग्यसेवेच्या बाबतीत दिलासादायक ठरणारे सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात आता जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिलेल्या ५० लाखांच्या निधीतून ७ खोल्यांच्या सुसज्ज आपघात विभाग तयार होत आहे. हा विभाग वैद्यकीय सुविधेत भर घालणारा ठरणार आहे.
सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयास सेलू शहर व तालुक्यातील २ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९३ गावांतील रुग्णसेवेचा भार आहे. येथे ५० खाटांची सुविधा उपलब्ध आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांनी ९ ऑगस्ट २०१६ रोजी पदभार घेतल्यापासून येथील भौतिक सुविधांसह सर्व विभाग अद्ययावत झाले आहेत. बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवेत तर कमालीचा कायापालट झाला आहे. गेल्या डिसेंबर या एका महिन्याची माहिती पाहिली असता या रुग्णालयात ४५ नैसर्गिक प्रसूती झाल्या आहेत तर १९ सिझेरियन प्रसूती झाल्या असून, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया १०५, गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया ३, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया २ करण्यात आल्या. आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या वर्गातील महिलांच्या प्रसूतीसाठी तर हे उपजिल्हा रुग्णालय आशादायी ठरत आहे. त्याचबरोबर दररोज ओपीडीमधून किमान ३०० रुग्णांना येथे सेवा दिली जाते. रुग्ण रेफर करण्याचे प्रमाण अत्यल्प असणारे हे उपजिल्हा रुग्णालय रुग्णांसाठी आधार ठरत आहे.
कोरोना महामारीत तर येथील कोविड सेंटरचा पॅटर्न जिल्हाभरात आदर्श ठरला. येथे रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाण हे अत्यल्प आहे. केवळ अपघातातील रुग्णांना रेफर करावे लागत होते; परंतु, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत येथे ४९ लाख ८६ हजार रुपयाच्या निधीतून ७ खोल्या, शौचालयासह अद्ययावत अपघात विभागास मंजुरी मिळाली असून या पघात विभागाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू झाले आहे. सहा महिन्यांत काम पूर्ण होईल, असे शाखा अभियंता अभिषेक बुटोले यांनी सांगितले.
जखमींना मिळणार वेळेत उपचार
सेलू - देवगावफाटा, परभणी- पाथरी या रस्त्यावर अपघाताच्या अनेक घटना घडतात. या अपघातातील गंभीर जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून रेफर केले जात होते. त्यामुळे परभणी, नांदेड, औरंगाबाद येथील रुग्णालय गाठण्यास लागणारा बराच वेळ हा रुग्णांच्या जिवावर बेतणारा होता. मात्र, आता सुसज्ज अपघात विभागा कार्यान्वित झाल्यानंतर अपघातातील रुग्णांसाठी ही सुविधा नवसंजीवनी ठरणार आहे.