भावाच्या लग्नाला जाणाऱ्या बहीण-भावजीवर काळाचा घाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 07:56 PM2023-05-13T19:56:17+5:302023-05-13T19:56:43+5:30
सहावर्षीय भाचा बचावला, उमरीनजीक अपघात
लक्ष्मण कच्छवे
दैठणा (जि.परभणी) : भावाच्या लग्नासाठी निघालेल्या बहीण-भावजीच्या कारला भारस्वाडा टी-पॉइंटजवळ अपघात झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. यात वळणावर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार लिंबाच्या झाडाला आदळली. घटनेत पती-पत्नी जागीच ठार झाले, तर सहावर्षीय बालक जखमी झाले आहे. भावाच्या लग्नाला जाणाऱ्या बहीण-भावजीवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
पुणे येथील रहिवासी असलेले संगणक अभियंता आशिष अशोक वैद्य (३८) हे त्यांच्या पत्नी व मुलासोबत कारने नांदेडला मेव्हण्याच्या लग्नासाठी निघाले होते. नांदेड येथेच या पती-पत्नीचे कुटुंब असल्याचे समजते. येत्या ३० मे ला हे मेव्हण्याचे लग्न आहे. या लग्नासाठी ते जात होते. आशिष अशोक वैद्य हे त्यांच्या पत्नी प्रतिभा आशिष वैद्य (३३) व त्यांचा मुलगा सात्विक वैद्य (सहा) हे कार क्रं. (एमएच १२ युएस ७५६४)ने पुणे येथून नांदेडकडे येत असताना, भारस्वाडाच्या पुढे आले असता, एका वळणावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार लिंबाच्या झाडाला आदळली. यात हे दाम्पत्य जागीच ठार झाले. तर मुलगा सात्विक हा जखमी झाला. त्यास परभणीत उपचारासाठी हलविण्यात आले.
पोलीसांनी केले मदतकार्य
घटनास्थळी दैठणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलिस उपनिरीक्षक संजय वळसे, जमादार अतुल ब्रह्मनाथकर, मनोहर पडोळे, युनूस कुरेशी, आशिष मुळे, करवर यांनी भेट देत, जखमीस परभणीत उपचारासाठी पाठविले, तर मृतदेह उत्तरिय तपासासाठी परभणीला पाठविल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.