पोक्सो कायद्यान्वये आरोपी वडिलांना दहा वर्ष सश्रम कारावास
By राजन मगरुळकर | Published: March 19, 2024 06:32 PM2024-03-19T18:32:15+5:302024-03-19T18:33:15+5:30
परभणी जिल्हा न्यायालयाने सुनावली मंगळवारी शिक्षा
परभणी : पीडित मुलीला आरोपी वडिलांनी धमकी देत बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार पाथरी ठाण्याच्या हद्दीत घडला होता. या गुन्ह्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी निकाल दिला. ज्यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.एम.नंदेश्वर यांनी आरोपी वडीलास पोक्सो कायद्यान्वये दहा वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत माहिती अशी, पाथरी ठाण्यात ऑगस्ट २०२१ मध्ये पीडितेच्या आईने फिर्याद दिली. फिर्यादी तिचे पती, मुलासह राहते. यामध्ये फिर्यादीच्या मुलीला वडिलांनी अश्लिल व्हिडिओ दाखविले. सदरील बाब आईला सांगितली तर तुला व तुझ्या आईला फिनाईल पाजून मारून टाकेल, अशी धमकी दिली. तसेच पीडिता तिच्या भावंडासोबत घरात झोपली असताना आरोपी वडिलांनी बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. ही बाब पीडित मुलीने आईला सांगितली. त्यानंतर आईने पाथरी ठाण्यात फिर्याद दिली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक डॉ.मनोज अहिरे यांनी केला.
तपासात पोलिस अंमलदार साठे यांनी मदत केली. यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.एम.नंदेश्वर यांनी आरोपी वडील यास कलम चार पोक्सो अन्वये दहा वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, कलम ३५४ अ अन्वये तीन वर्ष कैद व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षाही सुनावली. मुख्य सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शात कोर्ट पैरवी अधिकारी संतोष सानप, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, दिलीप रेंगे, प्रमोद सूर्यवंशी, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.
दहा साक्षीदार तपासले
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ज्ञानोबा दराडे यांनी दहा साक्षीदार तपासले. तपासा दरम्यान आरोपीचा मोबाईल जप्त केला. विविध प्रकारचे फोटो व व्हिडिओ तपासणीसाठी न्याय सहाय्यक प्रयोग शाळेत पाठविले. न्यायालयासमोर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जबाब व पिडीतेचा जबाब यावरून लैंगिक अत्याचार झाल्याचे सिद्ध झाले. तसेच फॉरेन्सिक तज्ञ यांच्या साक्षीवरून सुद्धा सिद्ध झाले.