शौचालयाचा वापर न केल्यास होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:18 AM2021-01-03T04:18:18+5:302021-01-03T04:18:18+5:30
परभणी : शौचालयाचा नियमित वापर न करणाऱ्या नागरिकांवर यापुढे कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे ...
परभणी : शौचालयाचा नियमित वापर न करणाऱ्या नागरिकांवर यापुढे कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिला आहे.
१ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा परिषद सभागृहात स्वच्छ भारत मिशन आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता गंगाधर यंबडवार आदींची उपस्थिती होती. टाकसाळे म्हणाले, जे नागरिक उघड्यावर शौचास जातात, अशा नागरिकांना गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून प्रथमतः समज दिली जाईल. त्यात सुधारणा न झाल्यास अशा नागरिकांवर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ प्रमाणे कलम ११५ व ११७ नुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी शौचालयाचा नियमित वापर करणे, गावाचा परिसर स्वच्छ ठेवणे, घरोघरी शोषखड्ड्यांची निर्मिती करणे, सांडपाण्याचे योग्य नियोजन करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे अशा विविधांगी उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे टाकसाळे यांनी सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना सक्षमपणे पोहोचविण्यासाठी सद्य:स्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे हे तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तालुकानिहाय आढावा बैठका घेऊन आवश्यक त्या सूचना आणि कार्यवाही करीत आहेत. याअंतर्गत ही आढावा बैठक घेण्यात आली होती.