विशेष रेल्वे गाड्यांना जनरल डबे जोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:30 AM2020-12-03T04:30:06+5:302020-12-03T04:30:06+5:30
परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागाने औरंगाबाद विभागासाठी विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा केली असली तरी या गाड्यांना जनरल डबे ...
परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागाने औरंगाबाद विभागासाठी विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा केली असली तरी या गाड्यांना जनरल डबे नसल्याने प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. तेव्हा सर्व रेल्वे गाड्यांना जनरल डबे जोडावेत, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे.
लाॅकडाऊन काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. मात्र पूर्वीपासून सुरू असणाऱ्या रेल्वे गाड्यांना विशेष रेल्वेचा दर्जा देऊन अव्वाच्या सव्वा भाडेवाढ आकारण्यात येत आहे. या सर्व रेल्वे गाड्यांना संपूर्ण आरक्षित करण्यात आले आहे. तसेच सवारी आणि लोकल गाड्यांना बंद ठेवून गोरगरीब, मध्यमवर्गीय, अप-डाऊन करणाऱ्या नोकरदार वर्गाला रेल्वे प्रवासातून बेदखल करण्यात आले आहे. तेव्हा प्रवाशांची लूट थांबवून सर्व गाड्यांना जनरल डब्बे जोडावेत, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. या प्रश्नी त्वरित निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा.सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, खदीरलाला हाशमी, श्रीकांत गडप्पा, बाळासाहेब देशमुख, दयानंद दीक्षित आदींनी दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिला आहे.
मराठवाड, तपोवनचीही केली मागणी
रेल्वे प्रशासनाने कोरोनाची भीती दाखवणे बंद करून सर्व गाड्यांचा विशेष दर्जा रद्द करून गोरगरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाश्यांच्या सोयीसाठी प्रत्येक गाड्यांमध्ये जनरल डबे जोडणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या विभागातील मराठवाडा, तपोवन, मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस, नांदेड-पुणे सुपरफास्ट, नांदेड-श्री गंगानगर, जालना-दादर, काचिगुडा-अकोला, नांदेड-औरंगाबाद, नांदेड-बेंगलूरू, कोल्हापूर-नागपूर, अमरावती-पुणे, ओखा-रामेश्वरम्, नांदेड-अमृतसर (अकोला मार्गे), हैदराबाद-जयपूर (औरंगाबाद मार्गे), नांदेड-ऊना, औरंगाबाद-चेन्नई, धनबाद-कोल्हापूर, हैदराबाद-अजमेर (औरंगाबाद, अकोला दोन्ही मार्गे), इंदोर-यशवंतपूर आदी जलद गाड्यांसह सर्व सवारी गाड्या तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.