व्यसनाधीन बापाचा मुलाने काढला काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:13 AM2021-06-17T04:13:29+5:302021-06-17T04:13:29+5:30
देवगावफाटा : वारंवार सांगूनही दारूचे व्यसन सोडत नसल्याने दररोज घरात भांडण होत होते. त्यातूनच १४ जून रोजी रागाच्या भरात ...
देवगावफाटा : वारंवार सांगूनही दारूचे व्यसन सोडत नसल्याने दररोज घरात भांडण होत होते. त्यातूनच १४ जून रोजी रागाच्या भरात झालेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची कबुली मुुलाने पोलिसांसमोर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : हिस्सी येथील परमेश्वर भीमराव गायके हे १४ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सेलू येथून त्यांच्या घरी पोहोचले होते. याचदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. १४ जून रोजी मध्यरात्री परमेश्वर गायके यांच्या पार्थिवावर दोन वेळा अंत्यसंस्कर केल्याने संशय निर्माण झाला होता. याप्रकरणी १५ जून रोजी परमेश्वर गायके यांच्या तिन्ही मुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस पाटील सुदर्शन मगर यांनाही घटनेची माहिती विचारली. बुधवारी १६ जून रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल, पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, पोलीस उपनिरीक्षक जयपालसिंग कोटीतीर्थवाले, रामेश्वर मुंढे आदींनी पंचनामा करून जबाब नोंदविले. या चौकशीमध्ये मयताचा मुलगा हनुमान गायके याने सांगितले की, वडील परमेश्वर गायके यांना दारूचे व्यसन होते. ते घरातील मंडळींसोबत नेहमी भांडत असत. असेच भांडण घटनेच्या दिवशी सुरू असताना मी रागाच्या भरात वडील परमेश्वर गायके यांच्या डोक्यात मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घाबरलेल्या अवस्थेत मध्यरात्री एक कि.मी. अंतरावरील शेतात वडील परमेश्वर यांच्या प्रेताची विल्हेवाट लावली; परंतु प्रेत व्यवस्थित न जळाल्याने दुसऱ्यांदा अग्नी दिला. या माहितीनंतर सेलू पोलीस ठाण्यात घटनेच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी दिली.