जिल्ह्यात १६६ नव्या रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:07+5:302021-03-19T04:17:07+5:30
परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असून, गुरुवारी १६६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ...
परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असून, गुरुवारी १६६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६७२ झाली आहे.
मागील दीड महिन्यांपासून कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तीन दिवसांपासून तर दररोज शंभरपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी प्रशासनाला एक हजार १२६ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ८२० अहवालांमध्ये १०३ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर, रॅपिड टेस्टच्या ३०६ अहवालांत ६३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण नऊ हजार ९३७ रुग्णसंख्या झाली असून, त्यापैकी आठ हजार ९१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३४७ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ६७२ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ९५ एवढी असून, खासगी रुग्णालयात ४८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ४१९ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.
मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १५ मार्च रोजी १४७, १६ रोजी ११६, १७ रोजी २३५ आणि १८ मार्च रोजी १६६ रुग्ण जिल्ह्यात नोंद झाले आहेत.