नांदेडच्या बाधिताचा पत्ता 'टेकडी' चा 'टाकळी' झाला; अन पूर्णा वासियांचा जीव टांगणीला लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 01:43 PM2020-07-07T13:43:14+5:302020-07-07T13:48:30+5:30
धनगर टेकडी ऐवजी धनगर टाकळी गावाची चुकीने नोंद झालेल्या गोंधळामुळे तालुका प्रशासन गोंधळून गेले होते.
पूर्णा : नांदेड जिल्ह्याच्या कोरोना बाधितांमध्ये पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील वृद्धाची दि 6 जुलै रोजी चुकीने नोंद झाल्याने त्या गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. चौकशी नंतर मंगळवारी तो बाधित नांदेड जिल्ह्यातीलच असल्याचे निष्पन्न झाले.
नांदेडच्या रूग्णालयात उपचारार्थ असलेल्या एका 85 वर्षीय वृद्ध इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची नोंद सोमवारी रात्री जिल्हा प्रशासनाने काढलेल्या प्रेसनोट मध्ये झाली होती. यात सदरील व्यक्ती हा पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील असल्याची नोंद झाली होती. ही बाब सोशल मीडियातून पूर्णा परिसरात व्हायरल झाली. नंतर तो गावातील इसम कोण याची चौकशी सुरू झाली. गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी ही गावात चौकशी केली. तेव्हा गावातील कोणतीही व्यक्ती नांदेड येथील दवाखान्यात नसल्याचे निष्पन्न झाले.
धनगर टाकळी येथील मूळ रहिवाशी असलेल्या नांदेड येथील डॉ. गणेश जोशी यांनी आरोग्य विभागाकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मंगळवारी पहाटे 2 वाजता त्या इसमाचा मृत्यू ही झाला. त्यानंतर नातेवाईकांकडून मृत नांदेड जिल्ह्यातील धनगर टेकडी या गावचे असल्याचे निपन्न झाले. धनगर टेकडी ऐवजी धनगर टाकळी गावाची चुकीने नोंद झालेल्या गोंधळामुळे तालुका प्रशासन गोंधळून गेले होते. तर पूर्णा तालुक्यात ही चर्चेला उधाण आले होते. परंतु, खरी माहिती पुढे आल्याने गावातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. तर लवकरच या बाबत नांदेड जिल्हाप्रशासनाकडून शुद्धीपत्रकाद्वारे दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.