कार्तिकी एकादशीनिमित्त आदिलाबाद-पंढरपूर, नांदेड-पंढरपूर विशेष रेल्वे धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 06:32 PM2022-11-01T18:32:49+5:302022-11-01T18:34:52+5:30
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला भाविकांना जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे सोडल्या जाणार आहेत.
परभणी : पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून दोन विशेष रेल्वे चालविल्या जाणार आहेत. यामध्ये आदिलाबाद-पंढरपूर आणि नांदेड-पंढरपूर या रेल्वेचा समावेश आहे. याबाबत दमरेच्या नांदेड परिचलन विभागाने सोमवारी पत्र जारी केले आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला भाविकांना जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे सोडल्या जाणार आहेत. यामध्ये आदिलाबाद-पंढरपूर ही रेल्वे तीन नोव्हेंबर रोजी आदिलाबाद येथून दुपारी दोन वाजता सुटणार आहे. ही रेल्वे किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड मार्गे नांदेड येथे सायंकाळी ६:२० वाजता येणार आहे. पूर्णा येथे ७:२०, परभणी येथे ८:०५, गंगाखेड येथे रात्री नऊ वाजता, परळी येथे रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी पोहोचणार आहे. पुढे घाटनांदूर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद मार्गे ही रेल्वे पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात पंढरपूर-नांदेड ही विशेष रेल्वे चार नोव्हेंबर रोजी सकाळी १०:४५ वाजता पंढरपूर येथून सुटणार आहे. याच मार्गे ही रेल्वे नांदेड येथे रात्री साडेअकरा वाजता पोहोचणार आहे.
नांदेड-पंढरपूर विशेष रेल्वे सोमवारी
नांदेड-पंढरपूर ही विशेष रेल्वे ७ नोव्हेंबर रोजी सोमवारी सायंकाळी ६:३५ वाजता नांदेड येथून सुटणार आहे. ही रेल्वे पूर्णा येथे ७:२०, परभणी येथे ८:०५, गंगाखेड येथे रात्री नऊ तर परळी वैजनाथ येथे १०:५० वाजता पोहोचणार आहे. पुढे ही रेल्वे लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी मार्गे पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे पंढरपूर-आदिलाबाद म्हणून धावणार आहे. ही रेल्वे पंढरपूर येथून आठ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता निघणार आहे. ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १:४० वाजता ही रेल्वे आदिलाबाद येथे पोहोचणार आहे. या सर्व रेल्वेला २१ डब्बे जोडलेले असतील. ज्यात आठ शयनयान, एक वातानुकूलित, १० सर्वसाधारण, दोन एसएलआर डब्बे असतील.