शेतकऱ्यांच्या तक्रारी ऑनलाइनसह ऑफलाइनही स्वीकारण्याची आदित्य ठाकरेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 01:05 PM2024-09-05T13:05:13+5:302024-09-05T13:05:50+5:30
मानवत तालुक्यातील वझूर बुद्रुक येथील नुकसानीची केली पाहणी
मानवत (परभणी): ठाकरे गट शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मानवत तालुक्यातील वझुर बुद्रुक शिवारातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पाहणी केली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कृषिमंत्री फक्त बाहेरून बाहेरून महामार्गाच्या कडेने पाहणी करून नुकसान पाहणी दौरा आटपून घेत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच कृषिमंत्र्यांनी जमिनीवर उतरून नुकसानीची पाहणी करणे आवश्यक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
एक आणि दोन सप्टेंबर रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक सोयाबीन तूर आधी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे हे मानवत तालुक्यातील वझुर बुद्रुक येथे आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर, युवा सेना जिल्हाप्रमुख दीपक बारहाते यांच्यासह शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
सायंकाळी पाच वाजता आदित्य ठाकरे यांचे वजुर बुद्रुक या गावात आगमन झाले. पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करत यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. शेताच्या नुकसानासह घरातही पाणी घुसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या आजच्या दौऱ्यावरून त्यांनी विचारणा केली असता मुंडे आले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कृषिमंत्र्यांनी बाहेरून बाहेरून हायवेच्या कडेने शेतांची पाहणी केली. त्यांनी जमिनीवर उतरून पाहणी करावी अशी टीका, आदित्य ठाकरे यांनी केली.
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कृषी विभागाला शेतकऱ्यांच्या तक्रारी ऑनलाइनसह ऑफलाइन देखील स्वीकारण्याची मागणी केली. वझुर (बु) नंतर रामेटाकळी शिवारातही ठाकरे यांनी नुकसानग्रस्त कापसाची पाहणी केली. दौऱ्या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.