मोफत वितरणाचे धान्य अद्याप प्रशासनालाच मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:18 AM2021-04-28T04:18:48+5:302021-04-28T04:18:48+5:30
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यशासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील तसेच गरजू ...
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यशासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील तसेच गरजू पात्र कुटुंबीयांना राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अशा लाभार्थींना दरमहा दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू देण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भातील घोषणा १३ एप्रिल रोजी करण्यात आली होती. या घोषणेला १४ दिवसांचा कालावधी लोटला आहे; परंतु अद्याप सदरील धान्य जिल्हा पुरवठा विभागाला मिळालेले नाही. त्यामुळे हे धान्य कधी मिळणार, याकडे लाभार्थींचे लक्ष लागले आहे.
मोफत धान्य काय मिळणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे पात्र रेशनकार्डधारकांना दरमहा दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू मोफत देण्यात येणार आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी
याअनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही; परंतु पुरवठा विभागातील सूत्रांनी मोफत वितरणाचे धान्य अद्याप मिळाले नसल्याचे सांगितले.
दोन महिन्यांपासून काम नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाने घोषणा केल्याप्रमाणे रेशन दुकानातून मोफत धान्य दिले पाहिजे. त्याचाच आता आधार आहे. आणखी किती दिवस सर्वकाही बंद राहणार, हेही निश्चित नाही. त्यामुळे पुढील दोन महिने मोफत धान्य देण्यात यावे.
- अशोकराव गोडबोले
सरकारने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला असला तरी हे धान्य अद्याप आम्हाला मिळालेले नाही. सध्या हाताला काहीही काम नाही. त्यामुळे रोजच्या जेवणाचा प्रश्न अवघड होत आहे. त्यामुळे सरकारने घोषणा केलेले धान्य तातडीने देण्याची व्यवस्था करावी.
- गुलाबराव सावळे
गेल्या वर्षभरापासून काम मिळणं कठीण होत आहे. मध्ये काही दिवस काम मिळालं होतं. आता दोन महिन्यांपासून पुन्हा सर्व काम बंद झालं आहे. त्यामुळे घर चालवणं अवघड होत आहे. त्यामुळे सरकारनं हे मोफत धान्य लवकर द्यावं. संकटाच्या काळात त्याचीच मदत होणार आहे.
- काशिनाथ साबळे