१२४ विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:30 AM2021-03-04T04:30:47+5:302021-03-04T04:30:47+5:30
मनरेगा योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेतून त्यांच्या शेतात विहिरी खोदण्यासाठी ३ लाख रुपये अनुदान कुशल आणि अकुशल ...
मनरेगा योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेतून त्यांच्या शेतात विहिरी खोदण्यासाठी ३ लाख रुपये अनुदान कुशल आणि अकुशल स्वरूपात दिले जाते. या योजनेच्या कामांना मान्यता देण्याचे अधिकार पूर्वी गटविकास अधिकारी यांना होते. मात्र योजनेच्या कामासाठी मंजुरी देताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याने शासनाने गटविकास अधिकारी यांचे अधिकार काढून घेऊन हे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत.
मनरेगा सिंचन विहिरींची कामे मंजूर करताना आता सेक्युवर सॉफ्टप्रणाली राबविण्यात येत आहे. त्यानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर वर्क कोड तयार करुन ऑनलाईन अंदाजपत्रकास मान्यता देऊन कामास अंतिम मान्यता दिल्या जात आहे. पाथरी पंचायत समितीकडून जून २०२० मध्ये १६६ सिंचन विहिरींचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आले होते. त्यातील १२४ कामांना जिल्हा परिषदेने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर ५५ कामांचे वर्क कोड तयार होऊन कामे सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे या लाभार्थांना दिलासा मिळाला आहे.
जुने ९८ कामे प्रगतिपथावर
तालुक्यात मनरेगा योजनेंतर्गत पूर्वी मंजूर असलेली ९८ कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. सध्या १४ कामांचे मस्टर काढले असून ३० कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे मागील काही दिवसापासून मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याचे दिसून येत आहे.
या गावातील सिंचन विहिरींना मिळाली मान्यता
पाथरी तालुक्यात १२४ सिंचन विहिरींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये देवेगाव ७, टाकळगव्हाण ३,गुंज खु. २,मुदगल ७,कासापुरी १०,डोंगरगाव ५,रेणापूर १०,तुरा ५, झरी ५, लोणी बु ५,पाथरगव्हाण बु. ४, ढालेगाव १,हदगाव बु.१०, बाभळगाव १०,वडी ९,देवनांदरा ५,सिमुरगव्हाण ६, खेरडा ४, बोरगव्हाण ५,जैतापुरवाडी ४, गौंडगाव २ या गावांचा समावेश आहे.