कौतुकास्पद ! परसबागेतून राबविला जातोय सेंद्रीय शेतीचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 07:22 PM2020-07-20T19:22:16+5:302020-07-20T19:22:54+5:30
पोषण आहाराचा स्तर वाढविण्यासाठी होणार फायदा
परभणी : तालुक्यातील उजळंबा येथे विवेकानंद सेवाभावी संस्था व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानांतर्गत परसबागेच्या माध्यमातून पोषणाचा स्तर वाढविण्यासाठी सेंद्रीय शेती सुरु करण्यात आली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण जीवनज्योती अभियान (उमेद) अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून परभणी तालुक्यातील उजळंबा येथे परसबाग तयार करण्यात आली आहे. या परसबागेमध्ये औषधी वनस्पती, पालेभाज्यांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये पूर्णत: नैसर्गिक पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. रासायनिक खताला फाटा देत, शेण खत व गांडुळ खताचा वापर करीत हा भाजीपाला पिकवला जाणार आहे. नुकतेच या प्रकल्पाचे समन्वयक विक्रम मोरे, संदीप भोजने, प्रा.विलास साखरे यांनी उजळंबा येथील माधवराव साखरे यांच्या शेतात हा प्रयोग केला. या माध्यमातून महिला, गरोदर महिला, किशोरवयीन मुली, लहान मुुले यांच्या जीवनामध्ये सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्याचा वापर वाढावा, यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे प्रकल्प समन्वयकांनी सांगितले.
बालकांसाठी लाभ
उजळंबा येथे परसबागेअंतर्गत सेंद्रीय पद्धतीने पिकविल्या जाणाऱ्या टोमॅटे, वांगे, कारले यासह फळ भाजीपाला ग्रामस्थांबरोबरच बालकांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे परसबागेतून सेंद्रीय शेतीचा राबविला जाणारा उपक्रम भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. शासनाच्या वतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून उमेद अंतर्गत या प्रकल्पाची देखरेख करण्यात येत आहे.