परभणी जिल्हा रुग्णालयात १२ वर्षानंतर सुरू झाला स्त्री रुग्ण विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 07:06 PM2018-03-23T19:06:55+5:302018-03-23T19:06:55+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल १२ वर्षानंतर स्त्री रुग्ण विभाग सुरू करण्यात आला असून, या विभागात सद्यस्थितीत २४ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे़ यामुळे महिला रुग्णांना दिलासा मिळाला आहे़ ‘लोकमत’च्या दणक्यानंतर प्रशासनाने हा विभाग सुरू केला आहे़
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल १२ वर्षानंतर स्त्री रुग्ण विभाग सुरू करण्यात आला असून, या विभागात सद्यस्थितीत २४ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे़ यामुळे महिला रुग्णांना दिलासा मिळाला आहे़ ‘लोकमत’च्या दणक्यानंतर प्रशासनाने हा विभाग सुरू केला आहे़
परभणी येथे २००५ मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ़ विमल मुंदडा यांनी स्वतंत्र स्त्री रुग्णालयास मंजुरी दिली होती़ त्यानंतर २००६ मध्ये ६० बेडचे स्त्री रुग्णालय जागेअभावी जिल्हा रुग्णालयातील स्त्री रुग्ण विभागात तात्पुरत्या स्वरुपात सुरू करण्यात आले होते़ त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने जिल्हा रुग्णालयासाठी मंजूर असलेला स्त्री रुग्ण विभाग सुरूच केला नव्हता़ तब्बल १२ वर्षे हा प्रकार सुरू होता़ ६ ते ८ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत केंद्र शासनाच्या सीआरएम पथकाने केलेल्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला़ ७० बेडचा रुग्ण विभाग बंद करून त्या जागेत ६० बेडचे स्त्री रुग्णालय सुरू केल्याच्या या प्रकाराविषयी सीआरएम पथकाने शासनाला सादर केलेल्या अहवालात ताशेरे ओढले होते़ या संदर्भातील माहिती ‘लोकमत’ला मिळाल्यानंतर १० मार्च २०१८ च्या अंकात ‘स्त्री रुग्ण विभाग १२ वर्षांपासून गायब’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते़
त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनात खळबळ उडाली़ या विषयी अनेकांनी संताप व्यक्त करून या संपूर्ण कालावधीत जिल्हा रुग्णालयात ज्यांनी ज्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांचा पदभार स्वीकारला, त्या सर्व अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती़
‘लोकमत’च्या वृत्तानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने १२ वर्षांपूर्वी बंद केलेला स्त्री रुग्ण विभाग पूर्ववत करण्याच्या हालचाली सुरू केल्या़ त्यानंतर दोन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअरच्या इमारतीमध्ये २४ खाटांचा स्त्री रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे येथे महिला आता उपचार घेऊ लागल्या आहेत़ या संदर्भात २२ मार्च रोजी सदर प्रतिनिधीने रुग्णालयात पाहणी केली असता, येथील कर्मचारी व रुग्णांनी ‘लोकमत’चे आभार व्यक्त केले़ आता स्त्री रुग्ण विभागाचा स्वतंत्र ७० खाटांचा विभाग सुरू करावा, जेणे करून जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी येणार्या महिला रुग्णांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी केली जात आहे़