भंडाऱ्याच्या घटनेनंतर मनपाला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:14 AM2021-01-15T04:14:57+5:302021-01-15T04:14:57+5:30

परभणी : भंडारा येथील दुर्घटनेनंतर महानगरपालिकेला जाग आली असून, शहरातील खासगी दवाखान्यांच्या फायर ऑडिट परवान्यांची तपासणी सुरू ...

After the incident of Bhandara, Manpala woke up | भंडाऱ्याच्या घटनेनंतर मनपाला आली जाग

भंडाऱ्याच्या घटनेनंतर मनपाला आली जाग

Next

परभणी : भंडारा येथील दुर्घटनेनंतर महानगरपालिकेला जाग आली असून, शहरातील खासगी दवाखान्यांच्या फायर ऑडिट परवान्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांमध्ये ही तपासणी पूर्ण होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे

शहरातील शासकीय आणि खासगी दवाखान्यांनी फायर ऑडिट करून महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र दरवर्षी प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे. यासंदर्भात दरवर्षी मनपाकडे नोंदणी केली जाते. या आर्थिक वर्षाचा विचार करता ९ महिने उलटले तरी या संदर्भाने तपासणी झाली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी फायर ऑडिट करून नूतनीकरण परवाना घेण्यासंदर्भात उदासीनता असल्याचे दिसून येते. चार दिवसांपूर्वी भंडारा येथे शासकीय रुग्णालयात आग लागून दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर सर्व प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या घटनेचा आधार घेऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हे ऑडिट करण्यात आले. वास्तविक यापूर्वीच फायर ऑडिट होणे अपेक्षित होते. मात्र, ते करण्यात आले नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालय प्रशासनाचाही ढिसाळपणा समोर आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयाने फायर ऑडिट आणि इलेक्ट्रीक ऑडिट करून घेतले. मात्र, खासगी रुग्णालयांचा प्रश्न कायमच आहे. त्यामुळे मनपाने आता शहरातील खासगी रुग्णालयाच्या फायर ऑडिटची तपासणी आणि परवाना नूतनीकरणाच्या तपासणीला १२ जानेवारीपासून सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरात किती रुग्णालयांनी परवान्यांचे नूतनीकरण केेले, किती रुग्णालये शिल्लक आहेत याची आकडेवारी मनपाकडे नाही. तपासणी पूर्ण झाल्यानंतरच आकडेवारी प्राप्त होईल, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे किती खासगी रुग्णालयांनी नूतनीकरण करून परवाने घेतले. फायर ऑडिट केले का ? या संदर्भातील माहिती सध्या तरी मनपाच्या अग्निशमन विभागाकडे उपलब्ध नाही.

शहरात १३९ नोंदणीकृत रुग्णालये

महानगरपालिकेच्या हद्दीत १३९ नोंदणीकृत रुग्णालये आहेत. या रुग्णालयांनी मनपाकडून वेगवेगळे परवाने घेतले आहेत. त्यात अग्निशमन विभागाच्या परवान्याचाही समावेश असतो. या परवान्याचे प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावे लागते. एप्रिल ते मार्च या काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र, जानेवारी महिना उजाडला तरीही परवाना नूतनीकरणासंदर्भात मनपाकडून कोणतीच कारवाई झाली नसून, आता कुठे अग्निशमन विभाग परवान्यांच्या अनुषंगाने तपासण्या करीत आहे.

महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेच मी खासगी रुग्णालयांच्या परवान्यांची तपासणी करून घेण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी तपासणी झाली होती. आता पुन्हा तपासणी केली जात आहे. शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट पूर्ण झाले असून, यात आढळलेल्या त्रुटींची माहिती रुग्णालय प्रशासनाला दिली आहे. खासगी रुग्णायलांच्या तपासणीची माहिती एक-दोन दिवसांत मिळेल.

देविदास पवार, आयुक्त मनपा परभणी

Web Title: After the incident of Bhandara, Manpala woke up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.