लॉकडाऊननंतर जिंतूर तालुक्यात रोजगाराचा प्रश्न बनला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:16 AM2020-12-24T04:16:18+5:302020-12-24T04:16:18+5:30

जिंतूर- कोरोना संसर्गामुळे तालुक्यातून मोठ्या शहरांसह परराज्यात रोजगारानिमित्त गेलेले अनेक युवक स्वगृही परतले आहेत. परंतु, आज अनेकांच्या हाताला काम ...

After the lockdown, the issue of employment in Jintur taluka became serious | लॉकडाऊननंतर जिंतूर तालुक्यात रोजगाराचा प्रश्न बनला गंभीर

लॉकडाऊननंतर जिंतूर तालुक्यात रोजगाराचा प्रश्न बनला गंभीर

Next

जिंतूर- कोरोना संसर्गामुळे तालुक्यातून मोठ्या शहरांसह परराज्यात रोजगारानिमित्त गेलेले अनेक युवक स्वगृही परतले आहेत. परंतु, आज अनेकांच्या हाताला काम नसल्यामुळे गावोगावी बेरोजगारांची संख्या आणखीनच वाढली अाहे. त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात जवळपास ३० हजार सुशिक्षित युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असून हे युवक व्यवसाय अथवा नोकरीनिमित्त देशातील महानगर, राज्य किंवा विदेशात गेले होते. मात्र, कोरोना महामारीमुळे त्यांना फटका बसला असून रोजगार संपुष्टात आले आहेत. त्यामुळे गावाची वाट या नवतरुण युवकांना धरावी लागली. हा सर्व प्रकार खरीप हंगामाच्या सुरुवातीस झाल्याने काहींनी शेती करणे पसंत केले तर काही युवक बेरोजगार राहिले. त्यामुळे त्यांचा भार कुटुंबांना सोसावा लागला. तालुक्यात एकही मोठा उद्योगव्यवसाय आजघडीला सुरू नाही. औद्योगिक वसाहतीत परराज्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे तालुक्यातील युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध केला जात नाही. त्यात अनेक लघुउद्योग असले तरी स्थानिक मजुरांना मात्र रोजगार उपलब्ध केला जात नाही, अशी ओरड होत असते. तालुक्यात माजी राज्यमंत्री यांचा खत कारखाना तालुक्यातील अनेक युवकांसाठी रोजगाराचे केंद्र ठरला होता. परंतु, राजकीय धुळवडीमुळे मागील कित्येक वर्षांपासून तोही गंजून बंद पडला आहे. तर तालुक्यातील जवळपास १० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माजी आमदारांनी मोठा गाजावाजा करून साखर कारखान्याची पायाभरणी केली. परंतु, अजूनही हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. तालुक्यात मागील पन्नास वर्षांपासून राजकीय सत्तापालट होऊनही केवळ राजकीय इच्छाशक्तीअभावी तालुक्यातील उद्योग व्यवसायास गती मिळालेली नाही. आजही अनेक तरुणांना रोजगार देणाऱ्या उद्योगांचे काम थंडबस्त्यात आहे. निवडणूक आली की, राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून अनेक आश्वासने दिली जातात. मात्र, पूर्तता होत नसल्यामुळे जिंतूर तालुक्यात रोजगारनिर्मिती दीवास्वप्नच राहत आहे. त्यामुळे रखडलेले उद्योग-व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे. शासनाने स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करावी किंवा लघुउद्योगासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी शासनदरबारी केली आहे.

दारू, गुटखा विक्रीकडे वळले तरुण

मोठ्या शहरात उद्योग व्यवसाय करणारे तरुण मागील सहा महिन्यांपासून गावाकडे परतले आहेत. येथे हाताला काम न मिळाल्यामुळे अनेक तरुण अवैध मार्गाने दारू- गुटखा विक्रीकडे वळले असून त्यामधून रोजगार निर्माण करत आहेत. तालुक्यात उद्योग-व्यवसाय नसल्यामुळे तरुण पिढी या वाममार्गाकडे जात आहे.

Web Title: After the lockdown, the issue of employment in Jintur taluka became serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.