अनलॉकनंतर भाजीपाला २० ते २५ टक्क्यांनी महागला; वांगी २० रुपयांनी महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:23+5:302021-06-22T04:13:23+5:30
परभणी शहरातील बाजारपेठेत तालुक्यातील विविध गावांमधून तसेच शेजारच्या जिल्ह्यांमधून भाजीपाल्याची आवक होत असते. जिंतूर, मानवत, गंगाखेड येथीलही काही शेतकरी ...
परभणी शहरातील बाजारपेठेत तालुक्यातील विविध गावांमधून तसेच शेजारच्या जिल्ह्यांमधून भाजीपाल्याची आवक होत असते. जिंतूर, मानवत, गंगाखेड येथीलही काही शेतकरी परभणीच्या बाजारात आपला भाजीपाला विक्री करण्यासाठी येत असतात. परभणीत गेल्या काही दिवसांत बाजारात होणारी भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे बहुतांश भाज्यांच्या दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजट बिघडले आहे.
पुन्हा वरणावर जोर
बाजारात बटाटे, पानगोबी, वांगी, कोथिंबीर, दोडके, लसून, कांदा आदींच्या दरात वाढ झाली आहे. अगोदरच गॅस महाग झाल्याने घर चालवताना अडचण येत आहे. त्यात भाजीपाला महागल्याने अडचण येत आहे.
- सुनीता कवडे, गृहिणी
गॅस महागला आहे. काही दिवसांपूर्वी गोडेतेल महागले होते. ते थोडे स्वस्त झाल्याने दिलासा मिळाला असताना आता अत्यावश्यक असा भाजीपाला महागला आहे. त्यामुळे पुन्हा दाळच खावी लागणार आहे.
- सुलोचना मस्के, गृहिणी
म्हणून वाढले दर...
मार्च ते एप्रिलदरम्यान लागवड केलेला भाजीपाला आता संपला आहे. त्यामुळे शेतातून होणारी भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. अधिकचा भाजीपाला येण्यास वेळ लागणार आहे.
- एच.एम. वाघमारे, व्यापारी, परभणी
भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. अशात नागरिकांकडून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे टंचाईतून भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. बाजारात नवीन भाजीपाला आल्यास दर कमी होणार आहेत.
- सुरेश मोरे, व्यापारी, परभणी
शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा
शेतात काबाडकष्ट करून आम्ही भाजीपाला पिकवतो; परंतु आम्हाला म्हणावा तसा भाव मिळत नाही अन् बाजारात मात्र चढ्या दराने तो विकला जात आहे, याचे वाईट वाटते. त्यामुळे उत्पादकांना चांगला भाव मिळेल, असे धोरण ठरवणे गरजेचे आहे.
- अंबादास शेळके, शेतकरी
व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा भाजीपाला कवडीमोल दराने खरेदी केला जातो आणि शहरात नागरिकांना तो जास्तीच्या दराने विकला जातो. त्यामुळे व्यापारी मालामाल होत आहेत. शेतकरी हिताचा याबाबत निर्णय व्हावा.
- शंकरराव कोल्हे, शेतकरी