आठवडाभराच्या विश्रांतीनंतर परभणी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:57 AM2020-07-16T11:57:19+5:302020-07-16T11:58:38+5:30
पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने तालुक्यातील ७ गावांचा संपर्क तुटला आहे.
परभणी : जिल्ह्यात बुधवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला असून, सरासरी १२.१६ मिमी पावसाची नोंद महसूल प्रशासनाने घेतली आहे.जोरदार पावसाने पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने तालुक्यातील ७ गावांचा संपर्क तुटला आहे.
आठवडाभरापासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा जिल्ह्यात सक्रिय झाला आहे. बुधवारी रात्री सेलू तालुका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची हजेरी लागली आहे. पालम तालुक्यात सर्वाधिक ४०.३३ मिमी पाऊस झाला.
त्याखालोखाल पूर्णा तालुक्यामध्ये २६.४० मिमी, गंगाखेड तालुक्यात १८ मिमी, जिंतूर ६.१७, परभणी ६.८८ मिमी, सोनपेठ ७, मानवत आणि पाथरी तालुक्यात प्रत्येकी २.३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या वर्षीच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत ३०३ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
पूर्णा तालुक्यामध्ये सर्वाधिक ३६१.४०मिमी तर गंगाखेड तालुक्यात सर्वात कमी २३४.७६ मिमी पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे परभणी २७१ मिमी, पालम ३४२ मिमी, जिंतूर २५४.६६ मिमी, सोनपेठ २५८, पाथरी ३३८मिमी आणि मानवत तालुक्यामध्ये ३१३ मिमी पाऊस झाला आहे.