पुन्हा शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणामुळे शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्याने गळफास घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 03:30 PM2021-12-24T15:30:34+5:302021-12-24T15:33:02+5:30
पिककर्जाची वाट पाहत शेतकरी शिवसैनिक कर्जबाजारी झाला, आर्थिक कोंडी झाल्याने गळफास घेऊन जीव दिला
पाथरी ( परभणी) : पाथरी तालुक्यातील लोणी बु. येथील धोंडीराम गणपती गिराम ( 65 ) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 24 डिसेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. ते शिवसेनेचे ग्राम पंचायत सदस्य होते.
लोणी बु. येथील शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम गिराम यांना गतवर्षी राज्य शासनाची कर्ज माफी योजनेचा लाभ मिळाला. त्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा कमी होते. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नऊ हजार भरणाकरून खाते निल करण्यात आले होते. आता नातीचे लग्न करू या हेतूने त्यांनी स्वतःची व मुलगा सदाशिव गिराम याची पीक कर्जाची फाईल बँकेकडे दाखल केली. त्यावेळेस त्यांना महिन्यात कर्ज मिळेल असे सांगण्यात आले त्या भरवशावर त्यांनी नातीचे लग्न जमवले तारीख काढली. पण कर्ज नाही मिळाले.
यामुळे गिराम यांनी इतरांकडून पैसे घेऊन लग्न पार पाडले. पण सहा महिने झाले तरी कर्ज मिळाले नाही. ते बँकेच्या चकरा मारत राहिले. 1 महिन्यांपूर्वी त्यांचा ऊस योगेश्वरी कारखान्यास गेला त्यांनी देखील बिल काढले नाही. दोन दिवसांपूर्वी वीज मंडळाने लाईट कट केली व पैसे भरा तरच लाईट सुरू होईल असे सांगितले. खाजगी कर्ज वाढत होते, त्यात वीज बिल कसे भरायचे यामुळे गिराम आर्थिक विवंचनेत होते.
नैराश्यातून त्यांनी आज पहाटे 5 वा गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी अधिक तपास करत आहेत.