परभणीत पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी आता एजन्सी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 07:15 PM2019-10-03T19:15:56+5:302019-10-03T19:18:26+5:30

मनुष्यबळाच्या प्रश्नासह योजनेचे वाढणार आयुष्य

Agency for water supply works in Parbhani | परभणीत पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी आता एजन्सी

परभणीत पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी आता एजन्सी

Next
ठळक मुद्देदोन एजन्सींची होणार नियुक्तीस्कोडा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नियंत्रण

परभणी : युआयडीएसएसएमटी आणि अमृत योजनेतून नव्याने सुरू होणारी पाणीपुरवठा योजना शास्त्रशुद्ध पद्धतीने राबविली जावी, त्याचप्रमाणे या योजनेसाठी लागणारा तांत्रिक मनुष्यबळाचा प्रश्न सुटावा, यासाठी ही योजना त्रयस्थ एजन्सीमार्फत चालविण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला असून, त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत परभणीकरांना मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा होण्याची आशा निर्माण झाली आहे.

परभणी शहराची नवीन पाणीपुरवठा योजना आता अंतिम टप्प्यात आली आहे. योजनेची संपूर्ण कामे पूर्ण झाली असून, प्रत्यक्ष पाणीपुरवठा करण्यासाठी अवघ्या काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र ही योजना दीर्घकाळ टिकविण्यासाठी परभणीकरांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. नवीन पदभरती करण्यासाठी आकृतीबंध मंजूर नाही. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय योजना चालविण्यासाठी अभियंता, तांत्रिकदृष्ट्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांचीही आवश्यकता भासणार आहे. ही अडचण दूर करण्यासाठी मनपा आयुक्त रमेश पवार यांनी योजनेचा चालविण्याची आणि त्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचे काम एजन्सीमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीशुद्धीकरणापासून ते पाणी वितरणापर्यंतचे काम एजन्सी करणार आहे. 

महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडून प्रमाणित असलेली एजन्सी असावी किंवा पाणीपुरवठ्या अनुभव असणाऱ्यांना निविदा पद्धतीने काम दिले जाणार आहे. त्यासाठी ७ कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. आॅनलाईन पद्धतीने ही निविदा मागविण्यात आली असून, १० आॅक्टोबर ही निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एजन्सी नियुक्त झाल्यास पाणीपुरवठा योजनेतील पाणी शुद्धीकरण, ब्लिचिंग पावडरची खरेदी, पाणी वितरण, मुख्य जलवाहिनीसह शहरातील जलवाहिनीचे लिकेज दुरुस्ती यासह नागरिकांच्या तक्रारी सोडवून त्यांना मुबलक पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी या एजन्सीवर राहणार आहे. यातून महानगरपालिकेतील मनुष्यबळाचा प्रश्न सुटणार आहे. शिवाय शहरवासियांना दररोज पाणी मिळण्याची हमीही मिळणार आहे. त्यामुळे एजन्सीच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याची कामे करुन शहरातील मागील अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दोन एजन्सींची होणार नियुक्ती
संपूर्ण पाणीपुरवठा योजना चालविण्यासाठी महानगरपालिका दोन एजन्सीची नियुक्ती करणार आहे. त्यात पहिली एजन्सी येलदरीपासून ते परभणी शहरातील पाण्यांच्या टाक्यांपर्यंत जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पाणी आणण्याची जबाबदारी एका एजन्सीवर आहे. त्याचबरोबर ही एजन्सी मुख्य जलवाहिनीची गळती दुरुस्त करणे, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध करणे, ब्लिचिंग पावडर व इतर साहित्य खरेदी करणे आदी कामे करणार आहे. तर दुसरी एजन्सी जलकुंभापासून ते नागरिकांच्या प्रत्यक्ष घरापर्यंत पाणी वितरणाचे काम करणार आहेत. यात ही एजन्सी शहरातील गळती दुरुस्त करणे, व्हॉल्व्ह आॅपरेट करणे, नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविणे आणि प्रत्येक नागरिकाला मुबलक पाणी देण्याचे काम करणार आहे. या दोन्ही एजन्सीवर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे.

स्कोडा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नियंत्रण
युआयडीएसएसएमटी, अमृत योजनेतून शहराला पाणीपुरवठा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी किंवा काही बिघाड झाल्यास तो शोधण्यासाठी स्कोडा या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे़ या अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयातून सर्व जलवाहिनी, व्हॉल्व्ह आणि वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवले जाणार आहे़ ही अद्ययावत यंत्रणा परभणीत कार्यान्वित केली जाणार असून, या यंत्रणेमुळे सर्वांना समान पाणी वाटप होणार आहे़ शिवाय पाणी वितरण व्यवस्थेतील बिघाडही त्वरित शोधून दुरुस्त केला जाणार आहे़ 

नव्या आणि जुन्या योजनेतील फरक
- महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात सध्या ५३ कर्मचारी उपलब्ध आहेत. 
- नवीन योजनेसाठी सुमारे २५० कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे.

- परभणी शहराला सध्या दरडोई दर दिवशी १८ एमएलडी पाणीपुरवठा  होतो़ योजना कार्यान्वित झाल्यास दरडोई दरदिवशी ४५एमएलडी पाणीपुरवठा केला जाणार आहे़ 
- महानगरपालिकेकडे सध्या तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे़ नवीन योजनेत तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता दूर होणार आहे़ 

- परभणी शहरात सध्या दहा जलकुंभाच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो़ नवीन योजना सुरू झाल्यानंतर २७ जलकुंभातून पाणीपुरवठा होणार आहे़ 
- सध्याची शहरातील जलवाहिनी २५० किमी अंतराची आहे़ नवीन योजनेंतर्गत ४५० किमी जलवाहिनीच्या सहाय्याने पाणीपुरवठा होणार आहे़ 

परभणी शहराची पाणीपुरवठा योजना दीर्घकाळ चालावी, तसेच या योजनेसाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पाणी वितरणाचे काम एजन्सीमार्फत केले जाणार आहे़ दहा वर्षांसाठी ही एजन्सी नेमली जाणार असून, शहरवासियांना दररोज पाणी मिळणार आहे़ शिवाय नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडवून एक चांगली सेवा देण्यासाठीच ही एजन्सी नेमली जाणार आहे़ 
-रमेश पवार, आयुक्त, मनपा

Web Title: Agency for water supply works in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.