शेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 02:43 AM2019-07-23T02:43:08+5:302019-07-23T02:43:23+5:30

परभणी कृषी विद्यापीठात प्रशिक्षण प्रकल्प

Agricultural anchor robot shoulders; | शेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी

शेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी

Next

प्रसाद आर्वीकर 

परभणी : हवामानातील बदल, वारंवार येणारा दुष्काळ, मजुरांचा प्रश्न या परिस्थितीवर मात करण्यासाठी आता आपली शेती रोबोटच्याच हवाली केली जाणार आहे. त्यासाठीचा प्रशिक्षण प्रकल्प उभारण्यास येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास भारतीय कृषी संशोधन परिषदेने मंजुरी दिली आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचा देशातील हा एकमेव प्रशिक्षण प्रकल्प असेल. तीन वर्षांच्या या प्रकल्पासाठी १८ कोटींचा निधी परिषदेने मंजूर केला आहे़ या प्रकल्पाची प्राथमिक संकल्पना प्रमुख शास्त्रज्ञ डॉ़ गोपाळ शिंदे यांची असून, समन्वयक डॉ़ राजेश कदम आहेत.

यंत्र मानव (रोबोट), ड्रोन, स्वयंचलित डिजीटल साधनांचा समावेश असणाऱ्या विविध संशोधन प्रयोगशाळा निर्माण करून विद्यार्थी व संशोधक प्राध्यापकांना या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे़ कौशल्यप्राप्त प्रशिक्षणार्थी डिजीटल शेतीचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत नेतील.
कृषी विद्यापीठाने अ‍ॅग्री रोबोट, अ‍ॅग्री ड्रोन्स व अ‍ॅग्री स्वयंचलित यंत्राच्या देवाण-घेवाणीसाठी अमेरिकेतील वॉशिग्टन स्टेट युनिव्हर्सिटी तसेच स्पेन, युक्रेन व बेल्लारुस येथील विद्यापीठांशी करार केला आहे़ पवई व खरगपूर येथील आयआयटीचे नॉलेज
सेंटर म्हणूनही सहकार्य लाभणार आहे़

शेतीच्या वाढत्या समस्यांवर डिजीटल तंत्रज्ञानाच्या आधारे मात करणे शक्य आहे़ स्वयंचलित वाहनाद्वारे पीकहाताळणी, रोगनिदान व उपाय, काढणी व वाहतूक करणे शक्य होईल़ ड्रोनद्वारे कार्यक्षमरित्या पीक पाहणी व निरीक्षण, जमिनीतील शुष्कता, पिकांवरील रोग व
निदान, कीटकनाशकांची फवारणी हे कॅमेरा व सेंसर तंत्रज्ञानाद्वारे शक्य होईल़ या तंत्रज्ञानाद्वारे आवश्यक ती मनुष्यबळ निर्मिती करून रोजगार व स्वयंरोजगार संधी निर्माण केल्या जातील, असे कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांनी सांगितले.

Web Title: Agricultural anchor robot shoulders;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी