कृषी हाच जीवनाचा आधार; विद्यापीठांतून राष्ट्राला स्वयंसिद्ध करणारे संशोधन व्हावे: राज्यपाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 06:33 PM2022-04-22T18:33:03+5:302022-04-22T18:36:21+5:30
विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या पदवीधर, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांनी कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करावेत.
परभणी : शेती हाच देशातील सर्वसामान्यांच्या जीवनाचा आधार आहे. कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, संशोधकांनी व विद्यार्थ्यांनी राष्ट्राला स्वयंसिद्ध करण्यासाठी उपयोगी पडेल, असे संशोधन कार्य करावे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहून व्यक्त केले.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २४ वा दीक्षांत समारंभ २२ एप्रिल रोजी कृषी विद्यापीठ परिसरात पार पडला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ऑनलाइन माध्यमातून उपस्थिती होती. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून कृषी मंत्री दादा भुसे, प्रमुख अतिथी म्हणून राजस्थानच्या उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाँ. नरेंद्र सिंह राठोर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण, आमदार डॉ.राहुल पाटील यांच्यासह कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे संचालक, कुलसचिव डॉ.धीरज कुमार कदम, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी राज्यपाल कोश्यारी म्हणाो, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे तर परभणी येथील कृषि विद्यापीठ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्ताने विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या पदवीधर, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांनी कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करावेत. कृषी क्षेत्रात शिकलेल्या गोष्टींचा उपयोग प्रत्यक्ष शेती कामांमध्ये योगदान देण्यासाठी करावा. राष्ट्राला स्वयंसिद्ध बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमातून वसुंधरेसाठी सर्वांनी संकल्प करावा. याप्रसंगी कृषी मंत्री दादा भुसे यांनी मार्गदर्शन केले. डॉ.नरेंद्र सिंह राठोर यांनी दीक्षांत समारोहाचे मुख्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यापीठातून सुवर्णपदक मिळविलेल्या पदवीधर तसेच संशोधकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
४ हजार २३२ जणांना पदवीचे वितरण
२४ व्या दीक्षांत समारंभात वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात सन २०२०-२१ या वर्षात उत्तीर्ण झालेल्या व विशेष प्राविण्य मिळविलेल्या ४ हजार २३२ विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थी, संशोधक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.