शेततळ्यांचे गाव मिर्झापूर; जलसंधारणातून मिळाले शाश्वत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 05:11 PM2019-05-11T17:11:01+5:302019-05-11T17:14:30+5:30

. जिल्ह्यात प्रकल्प कोरडे पडले असताना अजूनही मिर्झापूर येथील शेतीला पाणी उपलब्ध आहे.

agriculture lake's village Mirzapur; Sustainable water received from water conservation at Parabhani | शेततळ्यांचे गाव मिर्झापूर; जलसंधारणातून मिळाले शाश्वत पाणी

शेततळ्यांचे गाव मिर्झापूर; जलसंधारणातून मिळाले शाश्वत पाणी

googlenewsNext

- प्रसाद आर्वीकर

परभणी : दोन वर्षांपासून निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीने एकीकडे येलदरी, निम्न दुधना या प्रकल्पांनी साथ सोडली असताना दुसरीकडे मिर्झापूर सारख्या छोट्याशा गावात घेतलेल्या तब्बल ६० तळ्यांनी शेतकऱ्यांना सिंचनाचा आधार दिला. जिल्ह्यात प्रकल्प कोरडे पडले असताना अजूनही मिर्झापूर येथील शेतीला पाणी उपलब्ध आहे. शेततळ्यांच्या उभारणीतून मिर्झापूरकरांनी इतर गावकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला असून हे गाव आता शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखले जात आहे.

सिंचनाची कुठलीही सुविधा उपलब्ध नसताना मिर्झापूर गावातील शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात शेततळे घेऊन पावसाचे पाणी साठविण्यास सुरुवात केली. या गावातील भास्कर प्रल्हादराव चट्टे आणि अच्युत रावसाहेब चट्टे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी २०१७ मध्ये  सर्वप्रथम पाच शेततळी घेतली. २०१७ च्या पावसाळी हंगामात शेततळ्यामध्ये पाणी जमा झाले. त्यानंतर रबी हंगामात पावसाने ताण दिला. इतर ठिकाणी दुष्काळामुळे पिके हाती आली नाहीत; परंतु, शेततळ्यामुळे शाश्वत पाणीसाठा निर्माण झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी इ. पिके बऱ्यापैकी निघाली.

शेततळ्यामुळे मिळालेला हा फायदा पाहून गावातून शेततळे घेण्यासाठी पुढाकार सुरु झाला. बघता बघता २०१८ च्या हंगामात या गावात ४२ शेततळ्यांची उभारणी तर २०१९ मध्ये १३ शेततळी बांधण्यात आली. सद्यस्थितीला ६० शेततळी या गावात निर्माण झाली आहेत. या शेततळ्यांमुळे परिसरातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. भूजलपातळी वाढल्याने विहिरींनाही पाणी उपलब्ध झाले आहे. सुमारे ७०० हेक्टरचे हे शिवार असून शेततळ्यामुळे या गावच्या पीक पद्धतीत बदल झाला आहे. पूर्वी सोयाबीन, कापूस ही कोरडवाहू पिके घेतली जात होती. आता मात्र हळद, पपई, ऊस ही बागायती पिके वाढली आहेत. शाश्वत पाणीसाठ्यावर सोपान पालवे यांनी ३ एकरांत, बबनराव चट्टे यांनी ४ एकरांत हळदीचे पीक घेतले आहे. तर पप्पू जाधव, विकास जाधव हे शेतकरी पपईचे उत्पादन घेत आहेत. याकामी कृषी विभागातील कृषी सहायक बी.एस. शिंदे, मंडळ अधिकारी बनकर, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे आदींनी ग्रामस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे शेततळ्यांची संख्या वाढली आहे. 

मत्स्य व्यवसायाचे नियोजन
मागेल त्याला शेततळे या योजनेतून मिर्झापूर येथे ६० शेततळ्यांची उभारणी  झाली असून आणखी १२ शेततळी प्रस्तावित आहेत. ही शेततळी साखळी पद्धतीने उभारण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला. सद्यस्थितीला गावातील ७ ते ८ शेततळ्यांमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी काळभैरवनाथ शेततळीधारक शेतकरी महासंघाची स्थापना केली असून या माध्यमातून मत्स्य व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे.

जनावरांसाठी पाणी राखीव 
मिर्झापूर गावात उभारलेल्या शेततळ्यांपैकी दोन शेततळ्यांमधील पाणीसाठा केवळ जनावरांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे चाऱ्यासह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे.

मिर्झापूर शिवारात शेततळे घेतल्याने रबी हंगामातील पिकांसाठी पाणी मिळाले. पावसाळा संपल्यानंतर निर्माण होणारा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांपासून जाणवत नाही. त्यामुळे रबी हंगामात पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले नसले तरी जनावरांचा चारा आणि सरासरी पीक उत्पादन घेता आले.
-अच्युत चट्टे, शेतकरी

दोन वर्षांपूर्वी २० बाय २५ बाय ३ आकाराचे शेततळे शेतात घेतले. तसेच संपूर्ण शेतातील पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळ्यात सोडले. त्याचा भरपूर फायदा शेतीला झाला. दुष्काळातही पिकाचे उत्पादन घेता आले. 
- भास्कर चट्टे, शेतकरी

Web Title: agriculture lake's village Mirzapur; Sustainable water received from water conservation at Parabhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.