निम्या कर्मचाऱ्यांवर चालतो कृषीचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:31 AM2021-03-13T04:31:05+5:302021-03-13T04:31:05+5:30
पालम: तालुका कृषी कार्यालयात तब्बल निम्मी पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचारी वर्गाला कसरती करीत तालुक्याचा कारभार सांभाळावा लागत ...
पालम: तालुका कृषी कार्यालयात तब्बल निम्मी पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचारी वर्गाला कसरती करीत तालुक्याचा कारभार सांभाळावा लागत आहे. याचा कामावर परिणाम होत असून शेतकरी अनेक योजनांपासून दूर राहत आहेत.
पालम शहरात गंगाखेड रस्त्यालगत खासगी भाड्याच्या इमारतीमध्ये शासनाचे तालुका कृषी कार्यालया कार्यरत आहे. मागील वर्षापासून तालुका कृषी अधिकारी बाबासाहेब देशमुख हे कायमस्वरूपी तालुका कृषी अधिकारी मिळाले असले तरीही कार्यालयातील समस्या मात्र जैसे थे आहेत. पूर्ण वेळ अधिकारी असूनही त्याच्या हाताखाली फिल्डवर काम करण्यासाठी मात्र कृषी सहायक कर्मचारी नाहीत. त्यामुळे एका कृषी सहायकाकडे तीन ते चार गावांचा पदभार देण्यात आला आहे. यामुळे शासनाच्या योजना ग्रामीण भागात पोहचवण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. अतिरिक्त पदभार असल्याने वेळेत काम होत जात नाहीत. पर्यवेक्षकाची ५ पदे मंजूर असून केवळ ३ जण कार्यरत आहेत तर २ पद रिक्त आहेत. कृषी सहायकाची २५ पदे मंजूर असून १२ जण कार्यरत आहेत. कार्यालयीन अधीक्षक व सहायक अधीक्षक पद रिक्त आहे. लेखापाल पद रिक्त आहे. कार्यालयीन मंडळ कृषी अधिकारी पद रिक्त आहे. सेवकाची ३ मंजूर असून १ पद रिक्त आहे. त्यामुळे रिक्त पदाचा फटका कामांना बसत असून खोळंबा होत आहे.