कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचाराविरोधात आजी-माजी विद्यार्थ्यांनी काढला आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 03:33 PM2017-10-10T15:33:10+5:302017-10-10T15:34:37+5:30
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी विद्यापीठातील आजी माजी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय इमारतीवर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी कुलगुरूंची खुर्ची गेटजवळ आणून त्यास हार घालून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
परभणी,दि.१० : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी विद्यापीठातील आजी माजी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय इमारतीवर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी कुलगुरूंची खुर्ची गेटजवळ आणून त्यास हार घालून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
विद्यापीठातील परीक्षा विभागात भ्रष्टाचार झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. भ्रष्टाचारामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला. दोषी अधिकारी निलंबित झालेच पाहिजेत अशा घोषणा देत मोर्चाला सुरुवात विद्यापीठातील कृषी महाविद्यालयापासून सुरुवात झाली. मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. मोर्चा प्रशासकीय इमारत परिसरात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी कुलुगुरूंची खुर्ची बाहेर आणून त्यास हार घालून आपला रोष व्यक्त केला. दोन तास हे आंदोलन करण्यात आले.
परीक्षा विभागातील उपकुलसचिव यांच्या वरदहस्ताने विद्यापीठात अंदाधुंद कारभार सुरू आहे. विद्यार्थ्यांचे गुण वाढविणे , उत्तरपत्रिका घरपोच पोहचविणे, जाणून बुजून निकाल उशिरा लावणे असे प्रकार येथे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. यामुळे परीक्षा विभागाच्या उपकुलसचिवांना निलंबित करावे, परीक्षा विभागातील काही कर्मचाऱ्यांनी खाजगी दलाल लावले आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क करून तडजोड केली जाते , अशा दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, उत्तरपत्रिका फेर तपासणीची फी १०० रुपायांऐवजी १० रुपय करावी, परीक्षा विभागास सर्व सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात , सर्व विषयाचे ऑनलाईन निकाल घोषित करावेत आदी मागण्या करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ आजी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ओंप्रकाशसिंह सिसोदिया, अनिल आढे, सुनील बागल, राजेंद्र लोणे, विजय सावंत, शरद हिवाळे, गौतम भालेराव आदीं पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.