परभणीतील अहिल्याबाई होळकर नगरात आगीत पाच घरातील संसारोपयोगी साहित्याची राख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 07:06 PM2019-12-23T19:06:32+5:302019-12-23T19:07:38+5:30
संसारोपयोगी साहित्य जळून खाक
परभणी : येथील एमआयडीसी भागातील अहिल्याबाई होळकर नगरातील एका घराला आग लागून घर मालकासह किरायाने राहणाऱ्या चौघांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
एमआयडीसी भागातील अहिल्याबाई होळकरनगरमध्ये छायाबाई मुस्तागर यांचे निवासस्थान आहे. या घरातील चार खोल्या किरायाने दिल्या आहेत. सोमवारी या सर्व घरांना कुलूप होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास या घराला अचानक आग लागली. घरातून आगीचे लोट बाहेर पडत असल्याने शेजारील नागरिकांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.काही वेळातच अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात अग्निशमनच्या कर्मचार्यांना यश आले. दरम्यान या आगीमध्ये छायाबाई मुस्तागर यांच्यासह त्यांच्या घरात किरायाने राहणाऱ्या चौघांचे संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सिलेंडर काढल्याने अनर्थ टळला
आग लागलेल्या घरामध्ये सर्व किरायदारांकडे गॅस सिलेंडर होते. येथील नागरिकांनी तत्परता दाखवत या घरातील एक सिलेंडर बाहेर काढले तर अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी तीन सिलेंडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला.