अजित दादांनी पाथरीत ऐनवेळी उमेदवार बदलला; आता आमदार राजेश विटेकर रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 02:54 PM2024-10-30T14:54:24+5:302024-10-30T14:58:17+5:30
माजी आमदार बाबाजानी यांनी अपक्ष अर्ज भरला असला तरीही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्याची हवा केली होती.
परभणी : जिल्ह्यात चार मतदारसंघांत १६९ उमेदवारांनी २२४ अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या दिवशी पाथरी विधानसभेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून निर्मला विटेकर यांच्याऐवजी आमदार राजेश विटेकर यांना रिंगणात उतरविले आहे.
परभणीत मंगळवारी आमदार राहुल पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करून अर्ज भरला. पाथरीत रासपचे सईद खान यांनी नेते महादेव जानकर यांच्या उपस्थितीत रॅली काढून अर्ज भरला. पाथरीचे आमदार सुरेश वरपूडकर यांनीही सभा घेऊन अर्ज भरला. जिंतूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत सभा घेऊन अर्ज भरला.
दुर्राणींच्या तुतारीची चर्चा हवेतच विरली
माजी आमदार बाबाजानी यांनी अपक्ष अर्ज भरला असला तरीही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्याची हवा केली होती. मात्र अर्जासोबत काही ए. बी. फॉर्म नव्हता. त्यामुळे उमेदवारीचे फटाके फोडले तरीही ऐनवेळी हा बार फुसका निघाला.
असे आहेत विधानसभानिहाय अर्ज
परभणी मतदारसंघात आजपर्यंत एकूण ४६ उमेदवारांनी एकूण ५९ नामनिर्देशन अर्ज दाखल केले. पाथरी विधानसभेत आजपर्यंत ५३ उमेदवारांनी ७७ नामनिर्देशनपत्रे दाखल केली; तर जिंतूरमध्ये आजपर्यंत ४१ उमेदवारांनी ५० अर्ज दाखल केले. गंगाखेड मतदारसंघात २९ उमेदवारांनी ३८ अर्ज दाखल केले आहेत.