दारुड्या मुलाचा शेतीवर होता डोळा; वाटणीस नकार दिल्याने वडिलांची झोपेतच केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 05:48 PM2020-07-16T17:48:21+5:302020-07-16T17:49:05+5:30
पालम पोलिसांनी आरोपी मुलास अटक करून गजाआड केले आहे.
पालम ( परभणी ) : तालुक्यातील पेंडू येथे शेतीच्या वाटणी करण्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा पोटच्या मुलाने खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी ( दि. १५ ) रात्री घडली. रामराव शेषराव धूळगुंडे (६० ) मृताचे नाव आहे. पालम पोलिसांनी आरोपी मुलास अटक करून गजाआड केले आहे.
पेंडू शिवारात धूळगुंडे परिवाराची ९ एकर शेती आहे. रामराव धूळगुंडे यांना ३ मुले आहेत. या तिघांना ६ एकर शेती वाटणी करून गावानजीकची ३ एकर शेती त्यांनी स्वतः च्या उदरनिर्वाहासाठी ठेवली होती. या शेतातील हिस्सा मला विकायचा आहे तो वाटून द्या म्हणून उत्तम रामराव धूळगुंडे ( ३२ ) याने तगादा लावला होता. तो व्यसनी असल्याने त्याची पत्नी मुलासह माहेरी राहते. शेती नावाने करून दिल्यास विक्री करेल या भीती पोटी आई वडिलांनी वाटणी करण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून उत्तम आईवडिलांना दारू पिऊन नेहमी मारहाण करत असे.
बुधवारी पाऊस पडल्याने शेतात काम करुन थकलेले रामराव धूळगुंडे आखाड्यावर झोपले होते. कोणी नसल्याने संधीचा फायदा घेत उत्तमने रामाराव यांना लाकडाने माराहाण करून खून केला. रामराव यांच्या पत्नी हरिबाई धूळगुंडे गुरुवारी सकाळी शेतात गेल्या असता त्यांना मृतदेह बाजेवर दिसला. बाजूच्या खोलीत आरोपी मुलाला पाहून त्यांनी घात झाल्याचा ठावो फोडत गाव गाठले. ग्रामस्थांना घेऊन त्यांनी पुन्हा घटनास्थळ गाठले. पोलीसांनी आरोपी उत्तमला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माने, जमादार नामदेव राठोड करीत आहेत.