मद्यशौकिनांना घरपोच मिळणार दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:12 AM2021-05-03T04:12:17+5:302021-05-03T04:12:17+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील सर्व दुकाने ...
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवली आहेत. मद्य विक्रीच्या दुकानांवर गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव होऊ नये, या उद्देशाने मद्य विक्रीच्या दुकानांतून घरपोच दारू विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. या आदेशानुसार मद्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी दुकानासमोर मद्य विक्री करू नये, तसेच पार्सल विक्री करण्यासही बंदी कायम आहे. संबंधित ग्राहकाला घरपोच सीलबंद बाटलीद्वारे मद्य पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठीही सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच्या वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या काळात अवैध दारू विक्री होणार नाही, याची राज्य उत्पादन शुल्क विभागाने काळजी घ्यावी, असेही निर्देश आदेशात देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे मद्यशौकिनांची मागील अनेक दिवसांपासून होत असलेली गैरसोय दूर होणार आहे.