एकाच पावतीवर दिवसभर वाळू वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:20 AM2021-03-01T04:20:02+5:302021-03-01T04:20:02+5:30
देवगाव फाटा: सेलू तालुक्यातील मोरेगाव व काजळी रोहिणा येथील दुधना नदीपात्रातील वाळू धक्क्यातून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. ...
देवगाव फाटा: सेलू तालुक्यातील मोरेगाव व काजळी रोहिणा येथील दुधना नदीपात्रातील वाळू धक्क्यातून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर भरधाव वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तर एकाच पावतीवर दिवसभर वाळू वाहतूक केली जात आहे.
सेलू तालुक्यात वाळूअभावी अनेक ठिकाणची बांधकामे ठप्प झाली होती. तर दुसरीकडे बाजारातील वाळू परवडत नव्हती. त्यामुळे नागरिकांनी वाळू उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी लावून धरली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील ३ हजार ४०० ब्रास तर काजळी रोहिणा येथील १ हजार ६६६ ब्रास वाळू उपशास मंजुरी दिली. २२ फेब्रुवारी रोजी संबंधित ठेकेदारांना या ठेक्यांचा ताबा दिला आहे. मागील आठवड्यापासून मोरेगाव व काजळी रोहिणा येथून सकाळपासून वाळूचा बेसुमार उपसा सुरु आहे. वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर दिवसभरात अनेक ट्रीप टाकण्याच्या नादात सुसाट वेगाने धावत आहेत. परिणामी प्रवासी व इतर वाहनांच्या सुरक्षेसाठी ते धोकादायक बनले आहे. अतिवेगाने धावणाऱ्या वाळू ट्रॅक्टरकडे मात्र महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच ट्रॅक्टरचे चालक एकच रॉयल्टी पावती फाडून तिचा दिवसभर वापर करीत आहेत. विना रॉयल्टी धावणाऱ्या वाहनांकडे सुद्धा महसूल विभागाचे लक्ष नाही. ही स्थिती रविवारी दिसून आली. सेलू शहरातील रायगड कॉर्नर परिसरातून रविवारी दुपारी १ ते २या एका तासात १३ ट्रॅक्टर भरधाव वेगाने वाळूची वाहतूक करताना दिसून आले. त्यामुळे याकडे महसूल प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
पाणीपातळीवर होणार परिणाम
सेलू तालुक्यातील दुधना नदीच्या पात्रातील वाळू उपशामुळे मोरेगाव, राजवाडी, वालूर, काजळी रोहिणा यासह आदी गावातील पाणी पातळीवर परिणाम होऊन पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण होत आहे. याकडे महसूल विभागातील अधिकारी यांनी लक्ष देऊन विना रॉयल्टी व भरधाव वेगाने धावणाऱ्या वाळू वाहनांवर कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाळू उपसा करताना वाहनधारकांकडे प्रत्येक फेरीला स्वतंत्र रॉयल्टी पावती असणे बंधनकारक आहे. रविवारी सकाळी भरधाव वेगाने वाळू घेऊन धावणाऱ्या एका ट्रॅक्टरला थांबवून चौकशी केली. तेव्हा या ट्रॅक्टर चालकाकडे पावती आढळून आली नाही. त्यामुळे हा ट्रॅक्टर वाळूसह तहसील परिसरात आणून जप्त करण्यात आला आहे. वाळू घेऊन विना रॉयल्टी व वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल.
- प्रशांत थारकर, नायब तहसीलदार, सेलू