कोनेरवाडीत एकाही घरी पेटली नाही चूल; साऱ्यांच्या नजरा विरपुत्राच्या पार्थिवाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:38 PM2018-04-04T12:38:12+5:302018-04-04T12:38:12+5:30
जवान शुभम मुस्तापुरे हे शहीद झाल्याची वार्ता कानावर पडताच कोनेरवाडी गाव शोकाकुल झाले आहे. काल रात्रीपासूनच एकाही घरात चूल पेटली नाही.
पालम (परभणी ) : जवान शुभम मुस्तापुरे हे शहीद झाल्याची वार्ता कानावर पडताच कोनेरवाडी गाव शोकाकुल झाले आहे. काल रात्रीपासूनच एकाही घरात चूल पेटली नाही. लाडक्या भूमीपुत्राच्या पार्थिवाच्या प्रतिक्षेत ग्रामस्थ आहेत. तर पालम शहरात बाजारपेठ कडकडीत बंद पाळून व्यापाऱ्यांनी दुखवटा पाळला.
मंगळवारी (दि. 3) सकाळच्या सुमारास कृष्ण घाटी नियंत्रण रेषेवर पाकने केलेल्या गोळीबारात शुभम शहीद झाले होते. दुपारी तीन पर्यत कोनेरवाडीत ते जखमी असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सायंकाळी पाच वाजता शुभम यांच्या आईवडिलांना पुत्राला वीरमरण आल्याचे कळाले. हे वृत्त समजल्यापासून अख्ख गाव शोकसागरात बुडाले आहे.
दरम्यान, आज सायंकाळपर्यंत शहीद शुभम यांचे पार्थिव गावात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ग्रामस्थांना शुभम यांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. दोन दिवसात कोणत्याही घरी चूल पेटलेली नाही. चाटोरी, बोरगाव येथील ग्रामस्थ कोनेरवाडीकरांना आधार देत आहेत. यासोबतच गावात सकाळी सातपासूनच पंचक्रोशीतील ग्रामस्थ येण्यास सुरुवाट झाली आहे. शहीद शुभम यांचे नातेवाईक, मित्र, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी मुस्तापुरे कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले.