परभणी जिल्ह्यात पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन; रात्रभर अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर
By राजन मगरुळकर | Updated: January 29, 2025 19:21 IST2025-01-29T19:21:34+5:302025-01-29T19:21:55+5:30
कोंबिंग ऑपरेशनमध्ये ३५ हॉटेल व ३८५ वाहने पोलिसांनी तपासली.

परभणी जिल्ह्यात पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन; रात्रभर अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर
परभणी : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेपर्यंत कोंबिंग ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये नाकाबंदी, वाहनांची तपासणी, गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. यात पाहिजे असलेल्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे ठाणेदार, स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक आणि अधिकारी, अंमलदार यांनी मंगळवारी रात्री कोंबिंग ऑपरेशन राबविले. यामध्ये १९ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. यात ३६ अधिकारी आणि ९७ अंमलदार नेमण्यात आले होते. कोंबिंग ऑपरेशनमध्ये ३५ हॉटेल व ३८५ वाहने तपासली. तसेच ३३ गुन्हेगारांना रात्रीच्या वेळी तपासण्यात आले. यात एका पाहिजे असलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले तर २४ अजामीनआत्र वॉरंट आरोपींना बजावण्यात आले. तीन तडीपार इसमांना सुद्धा या मोहिमेत तपासले.