पूर्णा येथील अनाथ मुलींना साऱ्या वस्तीनेच घेतले दत्तक; थाटामाटात लग्नही लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 06:57 PM2018-07-07T18:57:34+5:302018-07-07T19:04:38+5:30
लहानवयातच पालक गमावलेल्या चार अनाथ मुलींना कोळीवाड्यातील अख्या वस्तीनेच दत्तक घेतले.
पूर्णा (परभणी) : लहानवयातच पालक गमावलेल्या चार अनाथ मुलींना कोळीवाड्यातील अख्या वस्तीनेच दत्तक घेतले. ऐवढेच नाही तर चारही मुलींचे थाटामाटात लग्न लावले. यातील सर्वात लहान मुलीचे लग्न शुक्रवारी पार पडले.
शहराजवळ नदी काठी कोळी समाजाची वस्ती आहे. हलाखीच्या परीस्थित असलेली येथील नागरिक मजुरी करून आपला उदर निर्वाह करतात. २००६ साली येथे राहणाऱ्या कमलाबाई साहेबराव भिसे व त्याच्या एका मुलाचा आगीत जळाल्याने मृत्यू झाला. यानंतर अवघ्या सहा महिन्यानंतर साहेबराव भिसे यांचेही निधन झाले. यामुळे भिसे परिवारातील चार मुली अनाथ झाल्या.
या चौघींवर अचानक ओढवलेल्या या परिस्थित पूर्ण कोळीवाडा त्यांच्या पाठीशी उभा राहिला. येथील नागरिकांनी त्यांचे पालकत्व स्वीकारले. यासोबतच येथील वाल्मिक मित्र मंडळाने चौघींचीही भावासारखी काळजी घेतली. यातूनच २००८ साली सर्वात मोठी मुलगी धाराबाई, २०१० साली ज्योती, २०१४ साली वर्षा तर शुकवारी (दि. 6) सर्वात लहान मुलगी उज्वला हिचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे, साहेब कदम, नितीन कदम, संतोष एकलारे, सुनील जाधव आदींची उपस्थिती होती. कोळीवाड्यातील नागरिक व वाल्मिक मित्र मंडळ यांचे या कार्यामुळे कौतुक करण्यात येत आहे.