फोडणीसोबतच देवासमोरचा दिवाही तेलामुळे महागला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:17 AM2021-08-01T04:17:54+5:302021-08-01T04:17:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : दररोज तेलाच्या भावामध्ये होणारे बदल सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून टाकत आहे. मागील वर्षभरापासून सुरू झालेली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दररोज तेलाच्या भावामध्ये होणारे बदल सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून टाकत आहे. मागील वर्षभरापासून सुरू झालेली दरवाढ कायम आहे. यातच फोडणीसोबतच देवासमोरील दिव्याचे तेलही महागले आहे.
परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वच तेलांचे भाव तेजीत आहेत. यामध्ये पॅकिंगचे तेल तसेच भुसार व ऑइल भांडार येथील तेलाच्या भावात काहीसा फरक असला तरी आज हे दर वधारलेलेच आहेत. यापूर्वी फोडणीसाठी लागणाऱ्या सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ या तेलासोबतच देवासमोर दिवा लावण्यासाठी वापरले जाणारे तेलही महाग झाले आहे.
इंधन दरवाढ तसेच कच्चा माल महागला
शहरासह जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. यासह अन्य तेलवर्गीय बियाणांचेही उत्पादन घेतले जाते. दोन वर्षांपासून इंधन दरवाढ तसेच कच्च्या तेलाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे रिफायनरी तेलही महागले आहे.
शहरात पर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून पॅकिंग तेलाची मोठी आवक होते. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाचे दर वाढत आहेत. याचा परिणाम तेलाच्या दरावरही होत आहे. स्थानिक बाजारपेठेत तेल भांडारमध्ये मिळणारे तेल या पॅकिंगच्या तुलनेत थोडे स्वस्त आहेे.
दर महिन्याला किराणा व तेलासाठी ठरवून दिलेल्या रकमेमध्ये घसघसीत वाढ होत आहे. यामुळे महिन्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. खाद्य तेलाचे भावही वाढल्याने फोडणीसह देवासमोर लावण्यात येणाऱ्या दिव्याचाही कमी वापर झाला आहे.
- पूजा जोशी
गेल्या दोन वर्षांपासून दिवसेंदिवस तेलाचे भाव वाढत आहेत. ९० ते ९८ रुपये मिळणारे सोयाबीनचे तेल तब्बल दीडशे रुपये किलोवर पोहोचले आहेत. दिवसातून तीन वेळा होणाऱ्या फोडणीला ब्रेक बसला असून आता दोन फोडणीच होत आहेत.
-रेखा देशमुख