आधीच दुष्काळाच्या झळा चारा मिळेना; त्यात तारेला स्पर्श, स्पार्क होऊन वाहनभर कडबा खाक
By राजन मगरुळकर | Updated: April 3, 2024 17:36 IST2024-04-03T17:35:03+5:302024-04-03T17:36:50+5:30
परभणी शहरातील सेवक नगर भागातील घटना

आधीच दुष्काळाच्या झळा चारा मिळेना; त्यात तारेला स्पर्श, स्पार्क होऊन वाहनभर कडबा खाक
परभणी : शहरातील सेवक नगर भागातून छोटा हत्ती वाहनामधून कडबा घेऊन जात असताना त्या वाहनामधील कडब्याचा स्पर्श वीज तारेला झाल्याने स्पार्किंग झाली. यामुळे आग लागली. त्यात कडब्याने पेट घेतला. ही घटना बुधवारी दूपारी दीडच्या सुमारास परभणी शहरातील सेवक नगर भागात घडली.
घटनेनंतर त्वरीत ही माहिती नागरिकांनी मनपाच्या अग्निशमन दलाला दिली. अवघ्या पाच ते दहा मिनिटात अग्निशमन दल तेथे दाखल झाले. अग्निशमन दलाच्या बंबासोबत कर्मचारी दाखल झाले. त्यांनी ही आग पाण्याचा मारा करुन आटोक्यात आणली. यामध्ये कोणतीही जीवित, वित्तहानी झाली नाही. मात्र, कडब्याचे जळून नुकसान झाले. लोंबकळत्या वीज तारेला स्पर्श झाल्याने स्पार्क होऊन ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे काही वेळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाच्या यंत्रणेने काही वेळातच आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
यामध्ये अग्निशमनचे वसीम अखिल अहमद, गौरव देशमुख, उमेश कदम, अक्षय पांढरे यांचा सहभाग होता. दरम्यान, वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी वाहने चालविताना सोबतच उन्हापासून बचाव करताना काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच शहरात वीज तारेला स्पर्श होईल अशा प्रकारचे साहित्य वाहनातून नेऊ नये, जेणेकरून संभाव्य आगीच्या घटना रोखण्यास मदत होऊ शकेल.